तृतीयपंथीयांसाठी आश्रय योजनेतून घरे द्या
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांना आश्रय योजनेंतर्गत घरे देण्यात यावीत, अशी मागणी केली जात आहे. मात्र, अद्याप एकाही तृतीयपंथीयाला महानगरपालिकेकडून घर मिळालेले नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष घालून तृतीयपंथीयांसाठी घरे उपलब्ध करून द्यावीत, अशा मागणीचे निवेदन ह्युमॅनिटी फाऊंडेशनच्यावतीने बुधवार दि. 2 रोजी मनपा आयुक्तांना देण्यात आले. तृतीयपंथी हे समाजातील मागास आणि दारिद्र्यारेषेखालील असलेला समुदाय आहे. लिंगभेदामुळे बहुतांश जणांना कुटुंबीयांनी हकालपट्टी केली आहे. या कारणामुळे तृतीयपंथीयांना सुरक्षा व स्वत:चे घर नाही. तृतीयपंथी उद्योग, शिक्षण आणि आरोग्य सेवेपासून वंचित आहेत. अनेकांना शारीरिक आजार जडले आहेत. त्यातच वाढत्या महागाईमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याने तृतीयपंथींसाठी स्वत:चे घर असणे गरजेचे आहे. त्यामुळे आश्रय योजनेंतर्गत तृतीयपंथींसाठी विशेष वसती योजना राबवून घरे देण्यात यावीत. या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ह्युमॅनिटी फाऊंडेशनचे अध्यक्ष संपत दोडमनी, चिन्नू तळवार, जे. एम. जाफर, प्रकाश मराठे, मल्लेश पुजारी, नागेश सम्मगड, नागराज वड्डर, महम्मद बागेवाडी यांच्यासह फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.