योजनांची आर्थिक मदत तातडीने द्या
डॉ. प्रमोद सावंत यांचा अधिकाऱ्यांना आदेश : अर्थसंकल्पीय आढावा बैठकीत विविधांगी चर्चा
पणजी : राज्यातील विविध योजनांची आर्थिक मदत लाभार्थ्यांना तातडीने देण्याचा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. सर्व योजनांच्या निधीचे वितरण आधार कार्डचा वापर करून करण्यात यावे असेही त्यांनी बजावले आहे. पर्वरी येथील मंत्रालयात काल सोमवारी झालेल्या सरकारी अधिकारी, खाते प्रमुखांच्या अर्थसंकल्पीय बैठकीत वरील सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दयानंद सामाजिक सुरक्षा, लाडली लक्ष्मी, गृह आधार, कलाकार सन्मान निधी अशा विविध योजनांतील मदत आता लाभार्थ्यांना लवकरच मिळणार आहे. अनेक येजनांचे पैसे थकीत राहिल्याने हा आदेश डॉ. सावंत यांनी दिला आहे.
अर्थसंकल्प सर्वसमावेशक असेल
राज्य सरकारतर्फे सादर करण्यात येणाऱ्या अर्थ संकल्पात सामान्यांच्या सूचनांचा विचार करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असा असेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी विविध खात्यांचे सचिव, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय योजनांचाही आढावा
केंद्र पुरस्कृत योजनांच्याही अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. त्यामुळे नवीन केंद्रीय योजना राज्यात लागू केल्या जाऊ शकतात. दक्षिण आणि उत्तर या दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयांमधील विविध प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यावरही चर्चा झाली.
ऑनलाईन सेवांचे पुनरावलोकन
विविध ऑनलाइन सेवांचे पुनरावलोकन आणि ऑनलाइन मोडमध्ये नवीन सेवांचे ऑनबोर्डिंगबाबत मुख्यमंत्री सावंत यांनी माहिती जाणून घेतली. याशिवाय ग्रीन बजेट, कचरा व्यवस्थापन, पर्यटनासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर आणि वेळबद्ध ऑनलाइन सेवा आणि राज्याचा विकास मजबूत करण्यावरही वित्त बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
योजनांमध्ये पारदर्शकता वाढवा
मुख्यमंत्री सावंत यांनी अधिकाऱ्यांना निर्देश देताना सांगितले की, दीनदयाळ सामाजिक योजना, लाडली लक्ष्मी, गृह आधार, कलाकर सहाय्य योजना आणि समाजकल्याण योजनांची थकबाकी याकडे लक्ष देण्यात यावे. पारदर्शकता वाढवण्यासाठी आधार आधारित पेमेंट सिस्टमची अंमलबजावणी जलद करण्याचीही सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली.