सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाला सुविधा पुरवा
खासदाराना निवेदन : विकासासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन
खानापूर : येथील पी. एम. श्री हायस्कूल आणि पदवीपूर्व सरकारी महाविद्यालयाच्या विकास समितीच्या शिष्टमंडळाने खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांची भेट घेऊन या महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा आणि विकासाबाबत आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या उपस्थितीत निवेदन दिले. खासदार हेगडे यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण महाविद्यालयाच्या विकासासाठी निश्चित अनुदान मंजूर करू, असे आश्वासन दिले. रविवारी खासदार विश्वेश्वर हेगडे हे खानापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या समितीचे उपाध्यक्ष प्रसन्ना कुलकर्णी आणि सदस्यांनी भेट घेवून महाविद्यालयातील पायाभूत सुविधाबद्दल चर्चा केली.
यावेळी 620 हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्क, शौचालय यासह वर्ग खोल्यांची कमतरता आहे. त्याचबरोबर इतर शैक्षणिक पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तसेच पी. एम. श्री शाळेत पहिलीपासून दहावीपर्यंत शाळा असून, फक्त चार वर्ग खोल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या शाळेला किमान दहा वर्ग खोल्यांची गरज आहे. तसेच पी. एम. श्री शाळेत विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक व्यवस्था तातडीने पुरविण्यात याव्यात, यासाठी खासदार फंडातून महाविद्यालयाच्या आणि पी. एम. श्री शाळेच्या विकासासाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशा मागणीचे निवेदन यावेळी खासदारांना देण्यात आले. पी. एम. श्री शाळेचे अध्यक्ष रमेश पुजारी आणि सदस्य उपस्थित होते.