अंगणवाडी-मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्या
एआयटीयुसी संघटनेची राज्य सरकारकडे मागणी
बेळगाव : लहान मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, तसेच त्यांना सकस आहार मिळावा, यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या वेतनात 15 हजार रुपयांनी वाढ करावी व निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 3 लाख रुपयांची तरतूद करावी. तसेच मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सेवा पुरवाव्यात, या मागणीसाठी एआयटीयुसी संघटनेच्यावतीने सुवर्णविधानसौधसमोर आंदोलन करण्यात आले. सरकारी परवानगीशिवाय खासगी संस्था नर्सरी, एलकेजी-युकेजी वर्ग सुरू करत आहेत. त्यामुळे अंगणवाड्या बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परवानगीविना शिशुवर्ग सुरू केले जाऊ नयेत, यासाठी कायदेशीर कारवाई करावी. अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा भत्ता वाढवावा, मातृवंदना प्रोत्साहन धन व भाग्यलक्ष्मी प्रोत्साहन धन दिले जावे, अंगणवाडी केंद्रामध्ये नव्याने गॅस व शेगडी उपलब्ध करून द्यावी, यासह विविध मागण्या अंगणवाडी सेविकांनी केल्या.
याचबरोबर मागील 24 वर्षांपासून सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह आहार बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यास कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये, शाळांमधील अंडी सोलण्यासाठी प्रतिअंडे 1 रुपया भत्ता मिळावा, शंभर विद्यार्थी असलेल्या शाळेत केवळ दोनच स्वयंपाकी असल्याने भार पडत असून अशा ठिकाणी किमान तीन मध्यान्ह आहार कर्मचारी नेमावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नगर प्रशासन विभागाचे मंत्री रहिम खान यांनी अंगणवाडी, तसेच मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. एआयटीयुसीच्या पाच सदस्यांना संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.