यल्लम्मा डोंगरावर सुविधा उपलब्ध करा
कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची मागणी
बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगर मार्गशिर्ष यात्रा दि. 12 ते 15 डिसेंबरपर्यंत होणार असून भाविकांना यात्रा काळात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सदस्यांनी गुरुवार दि. 21 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. शिरस्तेदार एस. एन. परगी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविक डोंगरावर येताना सोबत आहार साहित्य, बिछाना व इतर वस्तू आणतात. त्यासाठी डेंगरावर निवास करून रहात असणाऱ्या जागेपर्यंत वाहने नेण्यासाठी परवानगी द्यावी, देवीच्या विशेष व इतर दर्शनाच्या बाबतीत आकारण्यात येणारे शुल्क कमी करावे, प्रवेश आणि पार्किंग शुल्काचे फलक इंग्रजी भाषेत ठळक अक्षरात लावण्यात यावेत, शयनगृह व भक्त निवासातील खोल्यांची स्वच्छता राखण्यात यावी, तेथे पिण्यासाठी शुद्ध पाणी, विजेचा अखंडपणे पुरवठा करण्यात यावा. देवीच्या पूजेचे थेट प्रक्षेपण मंदिर परिसरात पडद्यावर करण्यात यावे, मंदिर आणि डेंगरावरील निवासस्थानांची जंतुनाशकांनी स्वच्छता करण्यात यावी, देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांमध्ये महिलांची संख्या अधिक असते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी महिला पोलीस व महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी. यात्रेच्या काळात मद्य व मांस विक्रीला निर्बंध घालावेत, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. मागण्यांच्या प्रति रेणुका मंदिर देवस्थान, कार्यकारी अधिकारी, सौंदत्ती पोलीस स्थानक यांनाही देण्यात आल्या आहेत.