कैगा प्रकल्पात स्थानिकांना रोजगार द्या!
मागणीसाठी कैगा चलो बृहत पदयात्रा : मागणी मान्य न केल्यास कारवार बंद करण्याचा इशारा
कारवार : जिल्ह्यातील कैगा अणुउर्जा प्रकल्पात स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि कैगा नोकरभरतीची परीक्षा केंद्र जिल्ह्यातच सुरू करावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी कैगा चलो बृहत पदयात्रा हाती घेण्यात आली आहे. या पदयात्रेचे आयोजन येथील युवानेते रघु नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा विद्यार्थी वक्कुट संघाने केले आहे. या पदयात्रेला कारवार तालुक्यातील वेगवेगळ्या संघ, संस्थांनी समर्थन दिले आहे. राज्यातील एकमेव कैगा अणुउर्जा प्रकल्प कार्यरत होवून सुमारे तीस वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. या प्रकल्पावर केंद्र सरकारने हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्रत्येकी 220 मेगावॅट क्षमतेच्या चार अणुभट्ट्या या प्रकल्पात कार्यरत आहेत. प्रत्येकी 700 मेगावॅट क्षमतेच्या आणखी दोन अनुभट्ट्या (अनुभट्टी क्र. 5 आणि 6) येथे आकार घेत आहेत. अनुभट्टी पाच आणि सहा उभारणीसाठी 34 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेले कॉन्ट्रॅक्ट एका मेगा कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पातून कोट्यावधी युनीट उर्जा तयार होत असते.
प्रकल्पासाठी स्थानिकांचा त्याग
अणुउर्जा प्रकल्प उभारणीसाठी स्थानिकांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आहे. तथापि, प्रकल्पांच्या सेवेत सामावून घेताना स्थानिकांच्या ऐवजी उत्तरप्रदेश, बिहार, आंध्रप्रदेशसह अन्य राज्यातील युवक आणि युवतींना संधी दिली जाते. इतकेच नव्हेतर कैगा प्रकल्प नोकरभरतीची परीक्षा कारवार जिल्ह्यात नव्हेतर अन्यत्र घेतली जाते. त्यामुळे स्थानिकांवर फार मोठा अन्याय होत आहे, असा आरोप अनेक वर्षांपासून केला जात आहे. म्हणून स्थानिकांच्या मागण्यांकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी येथून कैगा चलो बृहत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी येथे रघु नाईक यांच्या नेतृत्वाखाली जमा झालेल्या शेकडो स्थानिकांनी पहिल्यांदा येथील श्री गणपती देवस्थानात पूजा केली. त्यानंतर येथील सुभाषचंद्र बोस, श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, हंजा नाईक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले आणि पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी स्थानिकांना कैगा अणुउर्जा प्रकल्पास रोजगार मिळालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा देवून परिसर दणाणून सोडण्यात आला.
त्याग आम्ही करायचा आणि रोजगार इतरांना
या प्रसंगी बोलताना रघु नाईक म्हणाले, प्रकल्प उभारणीसाठी आम्ही त्याग करायचा आणि रोजगार संधी इतरांनी लाटायच्या, हा कुठला न्याय? असा प्रश्न उपस्थित करून नाईक पुढे म्हणाले, रोजगारांची संधी अन्य राज्यातील युवकांना द्यायची आणि आमच्या युवकांनी गोवा, बेंगळूरला जायचे, याची आम्हाला लाज वाटली पाहिजे. किमान आतातरी आमच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा भविष्यात आम्ही कारवार बंदचे आयोजन करू, असा इशारा पुढे रघु नाईक यांनी दिला. यावेळी येथील श्री छत्रपती शिवाजी सेवा समितीचे अध्यक्ष जनार्दन गावकर, दलित संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक कुडाळकर, सदाशिवनगर ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष नितीन बांदेकर यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.