खेळाडूना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देऊ
आमदार विठ्ठल हलगेकर, ओलमणी येथे क्रिकेट लिग स्पर्धांचे उद्घाटन
वार्ताहर /जांबोटी
खानापूर तालुक्याच्या मातीत खेळणारे खेळाडू राष्ट्रीय पातळीपर्यंत चमकले पाहिजे, यासाठी क्रीडापटूना आवश्यक असलेली क्रीडांगणे तसेच योग्य प्रशिक्षण आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या क्रीडा मंत्रालयाअंतर्गत निधी मिळवून तालुक्यामध्ये सर्व सोयीनियुक्त अशी क्रीडांगणे निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आम. विठ्ठल हलगेकर यांनी केले ओलमणी स्पोर्ट्स क्लबच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट लिग स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू हायस्कूलचे चेअरमन तुकाराम साबळे होते. प्रारंभी हणमंत जगताप यांनी प्रास्ताविक केले. जांबोटी ग्रा. पं.माजी उपाध्यक्ष संजय राऊत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी भूविकास बँकेचे संचालक विनोद डिचोलकर, आमटे ग्रा.पं. सदस्य अशोक गावकर, मोहन मुळीक आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच गणपती कंग्राळकर, पवन गायकवाड, अनंत सावंत, मारुती साबळे यांच्या हस्ते विविध देवदेवतांच्या फोटोंचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन तसेच माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते मैदानाचे पूजन व उद्योगपती विठ्ठल गावस यांच्या हस्ते चषकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, श्रीधर गेजम हे सीए परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच दामोदर नाकाडी यांची बैलूर कृषी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ओलमणी स्पोर्ट्स क्लबच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अजित सावंत, खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, सुनील देसाई, माजी आमदार अरविंद पाटील यांची युवकांना मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लैला शुगर्सचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हणमंत जगताप व आभार श्रीनाथ खाडे यांनी मानले. या स्पर्धेमध्ये एकूण 12 निमंत्रित संघांनी सहभाग घेतला असून या स्पर्धा 6 ते 14 जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत.