शंभर रु.च्या बाँड पेपरवर खरेदी केलेल्या घरांना मूलभूत सुविधा द्या
उ. कर्नाटक अंजुमन-ए-इस्लाम संघटनेची मागणी
बेळगाव : शंभर रुपयांच्या बाँडवर खरेदी केलेल्या घरे व भूखंडांना वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी उत्तर कर्नाटक अंजुमन-ए-इस्लाम संघटना बेळगाव शाखेच्या सदस्यांनी केली आहे. सदस्यांनी बुधवार दि. 27 रोजी मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, दहा ते पंधरा वर्षांपूर्वी अनेकांनी शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर 20×40, 30×40 चे भूखंड खरेदी करून तेथे घरे बांधली आहेत. काही भागांत खुल्या जागा आहेत. मात्र सरकारने अशा घरांना वीज व पाणी या मूलभूत सुविधा पुरविण्यास निर्बंध घातले आहेत. त्यामुळे या घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून घरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भूखंड खरेदी करून बांधण्यात आलेल्या घरांना वीज जोडणी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असून, कर्नाटक राज्यात आदेशाचे पालन होत आहे. मात्र अद्याप या घरांना वीज जोडणी देण्यात आलेली नाही. मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर घरे सक्रम (वैध) करून द्यावीत.