काजू विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करा
विक्रीचा यक्षप्रश्न : आर्थिक फटका बसत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांची मागणी
बेळगाव : बेळगाव तालुक्यात काजू विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांसमोर विक्रीचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. नाईलाजास्तव उत्पादकांना मिळेल त्या किमतीला काजू विक्री करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसू लागला आहे. काजू विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही उत्पादकांनी केली आहे. जिल्ह्यात बेळगाव आणि खानापूर तालुक्यात काजूचे उत्पादन घेतले जाते. मात्र काजू विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना शेजारील चंदगड तालुक्यातील आठवडी बाजारात काजू विक्री करावी लागत आहे. योग्य हमीभावाविना मिळेल ती किंमत घेऊन परतावे लागत आहे. त्यामुळे दरवर्षी काजू उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसू लागला आहे. विशेषत: डोंगर क्षेत्र आणि लाल मातीत काजूचे उत्पादन घेतले जाते. अलीकडे काजू क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे साहजीकच उत्पादनातही वाढ होऊ लागली आहे. मात्र उत्पादित काजू विक्रीचा प्रश्न गंभीर बनत आहे.
बाजारपेठ मागणीकडे साफ दुर्लक्ष
मागील कित्येक वर्षांपासून बेळगाव शहरात काजू विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करावी अशी मागणी होत आहे. मात्र याबाबत कृषी खाते, बागायत खाते आणि एपीएमसी व लोकप्रतिनिधीही उदासीन असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील बेळवट्टी, बडस, बिजगर्णी, बेळगुंदी, कावळेवाडी, कर्ले, बहाद्दरवाडी, जानेवाडी, सोनोली, कुद्रेमनी, बाची, बाकनूर, बडस, राकसकोप, यळेबैल, कोनेवाडी, बसुर्ते, बेकिनकेरे, अतिवाड, कल्लेहोळ आदी भागात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र उत्पादकांना बाजारपेठ नसल्याने गैरसोय होऊ लागली आहे. काजू हंगामाला जोमाने प्रारंभ झाला असून, उत्पादन सुरू झाले आहे. मध्यंतरी बदलत्या हवामानामुळे काजू बागायतीवर परिणाम झाला आहे.
योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादकांना फटका
काजूला योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादकांना फटका बसू लागला आहे. बाजारपेठेऐवजी ही परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. व्यापारी आणि विक्रेते मनमानीप्रमाणे काजूचा भाव ठरवत आहेत. त्यामुळे कमी दराचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. काजूला योग्य भाव मिळावा यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
बाजारपेठेसाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत
बेळगाव शहरात काजू विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने स्थानिक व्यापारी आणि विक्रेत्यांना काजू कमी दराने विकावी लागत आहे. त्यामुळे दरवर्षी फटका बसू लागला आहे. शेतकऱ्यांचा विचार करून विक्रीसाठी बाजारपेठेची निर्मिती करावी, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.
- सोमनाथ सावंत (काजू उत्पादक शेतकरी)