एसटी अपघातात गंभीर जखमी तरुणाला सक्षम नोकरी द्या
पाडलोस ग्रामस्थांची आगार व्यवस्थापक नीलेश गावित यांच्याकडे मागणी
न्हावेली / वार्ताहर
एसटी अपघातात गंभीर जखमी झालेल्या पडलोस येथील तरुण गणेश गावडे यांना केवळ आर्थिक मदत न देता त्याच्या नोकरीसाठी सक्षम प्रयत्न करा अशी मागणी पाडलोस ग्रामस्थांनी सावंतवाडी आगार व्यवस्थापक निलेश गावित यांच्याकडे केली. यावर आगार व्यवस्थापक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाडलोस उपसरपंच राजू शेटकर यांनी सांगितले. रोणापाल येथे झालेल्या एसटी - दुचाकी अपघातात पाडलोस भाकरवाडी येथील गणेश गावडे हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला केवळ उपचारार्थ मदत न करता उदरनिर्वाह करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात तरी नोकरी द्या अशी मागणी पाडलोच ग्रामस्थांनी यावेळी सावंतवाडी आगार व्यवस्थापक निलेश गावित यांच्याकडे केली. यावेळी उपसरपंच राजू शेटकर तसेच संतोष आंबेकर, प्रणित गावडे, बबलू गावडे, गोट्या गावडे, सुनील गावडे, रोहित गावडे, साहिल गावडे, सुयश गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.गावित म्हणाले की, संबंधिताला तातडीची मदत देण्यात आली आहे. तसेच तो बरा होईपर्यंत उपचाराचा खर्चही देण्यात येणार आहे. परंतु पाडलोस ग्रामस्थांनी अपघातग्रस्त गणेश गावडे यांच्या घरची परिस्थिती सांगितल्यावर गावित यांनी त्याला तात्पुरत्या स्वरूपात नोकरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे उपसरपंच राजू शेटकर यांनी सांगितले.