चिंबलमध्ये माझी जमीन असल्याचे सिद्ध करा : खंवटे
पणजी : चिंबलमध्ये माझी जमीन असल्याचे सिद्ध केल्यास त्यातील 50 टक्के गोविंद शिरोडकर यांना भेट देतो, तसेच उर्वरित जमिनीमधील 5 ते 10 टक्के मीडिया बंधूंना देतो आणि बाकी शिल्लक चिंबल वाड्यास देऊन टाकतो, असे जाहीर वक्तव्य मंत्री रोहन खंवटे यांनी केले आहे. चिंबलमधील युनिटी मॉलच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांचे नेते गोविंद शिरोडकर यांनी खंवटे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांसंबंधी विचारले असता मंत्री खंवटे यांनी वरीलप्रमाणे वक्तव्य केले.
शिरोडकर यांच्या दाव्यानुसार 2018 पासून चिंबल भागातील डोंगर आणि जमिनींवर खंवटे यांची वक्रदृष्टी पडली आहे. त्यामुळे शांत जीवन जगणाऱ्या चिंबलवासियांची झोप उडाली आहे. त्यातून त्यांना रोज काहीना काही त्रासांना सामोरे जावे लागत आहे. खंवटे यांच्या अनेक भानगडी यापूर्वीच आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या आहेत, असेही शिरोडकर यांनी आंदोलकांना संबोधतांना उघड केले होते. अशी धरणे यापूर्वी का झाली नाहीत. जेव्हा रहेजा, नाईकनवरे यासारख्या मोठ्या कंपन्यांनी गोव्यात येऊन याच भागात मेगा प्रकल्प उभारले तेव्हा आजचे आंदोलक कुठे होते, असा सवालही खंवटे यांनी यावेळी उपस्थित केला.