हिंदू समुदायासोबत उभे राहण्याचा गर्व
ट्रुडोंच्या द्वेषादरम्यान कॅनेडियन खासदाराचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ टोरंटो
कॅनडात हिंदूंच्या विरोधात वाढत्या हिंसेदरम्यान तेथील खासदाराने उघडपणे हिंदूंची बाजू घेतली आहे. कॅनडातील खासदार केविन वोंग यांनी टोरंटोमध्ये एका जाहीर कार्यक्रमात भाग घेत देशातील हिंदूंबद्दल स्वत:चे समर्थन व्यक्त केले आहे. टोरंटोच्या हिंदू समुदायासोबत उभे राहण्याबद्दल मला गर्व आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आल्याने मी हिंदू हेरिटेज फेस्टिव्हलच्या आयोजकांचा आभारी असल्याचे वोंग यांनी म्हटले आहे.
कॅनडाच्या या खासदाराचे आता हिंदू समुदाय कौतुक करत आहे. तर अन्य एक खासदार चंद्रा आर्य यांनी देशातील काही नेत्यांवर हिंदू आणि शिखांना जाणूनबुजून परस्परांच्या विरोधात उभे करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. काही नेते जाणूनबुजून या हल्ल्यासाठी खलिस्तान समर्थकांना जबाबदार ठरविणे आणि त्यांचा उल्लेख करणे टाळत आहेत. हे नेते याचा दोष अन्य घटकांना देऊ पाहत आहेत. अशाप्रकारे ते हिंदू आणि शिखांमधील हा मुद्दा असल्याचे चित्र उभे करून कॅनडाच्या लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आर्य यांनी केला आहे.