महामार्गावर आंदोलन छेडण्यास मनाई
जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश, शेतकऱ्यांचा आज कर्नाटक बंद
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
ऊसदर ठरवण्यासाठी गुर्लापूर क्रॉसजवळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत केंद्र व राज्य सरकारने या आंदोलनावर तोडगा काढला नाही तर शनिवारी 31 ऑक्टोबर रोजी महामार्ग रोकोचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्ग रोखण्यावर बंदी घातली आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शुक्रवारी यासंबंधी आदेश जारी केला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लिहिलेल्या पत्राच्या आधारावर बेळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग रोखणे, त्यावर निदर्शने करणे आदींवर निर्बंध घालण्यात आला आहे. हिरेबागेवाडी, हत्तरगी, कोगनोळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना काम करण्यापासून अडवण्यावरही कायद्याने बंदी घालण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग, सर्व्हिस रोड व टोलनाक्याजवळ ट्रॅक्टर, क्रूझर, ट्रक आदी वाहने उभी करून महामार्ग अडविण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. महामार्गावरील वाहतूक अडवणे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, महामार्गावर बसणे किंवा झोपण्यावरही जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने अडवण्याबरोबरच शाळा-कॉलेजमधून येणारे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व नागरिकांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
शेतकरी नेते शशिकांत गुरुजी व चुन्नाप्पा पुजारी यांनी 31 ऑक्टोबर रोजी महामार्ग रोको आंदोलन जाहीर केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बंदीचा आदेश जारी केला आहे. या आदेशानंतर शेतकऱ्यांनी शनिवारी कर्नाटक बंदची हाक दिली असून त्यानंतर जेल भरो आंदोलन जाहीर केले आहे. आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला आहे.
1 कोटी 80 लाख रुपयांचा टोल बुडाला
हत्तरगी टोलनाक्यावर दोन दिवस शेतकऱ्यांनी महामार्ग अडविल्याने 1 कोटी 80 लाख रुपयांचा टोल बुडाल्याचे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. टोल जमा करणाऱ्या संस्था या नुकसानीसाठी भरपाई मागण्याची शक्यता असल्यामुळे यापुढे महामार्ग रोको होऊ नये, याची काळजी घेण्याची विनंती पत्रात केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्ह्यात महामार्ग रोकोवरच प्रतिबंध जारी केला आहे.
