आंदोलने केली तरीही पाण्याचा डोह कायम
सातारा :
सातारा शहरात मान्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी आगमन केले. याच पावसाने सखल भागात पाणी साचून शहरवासियांना गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यामध्ये बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली तळ्याचे स्वरुप आले होते. त्याच तळ्यात गतवर्षी रिपाई एच्यावतीने आंदोलने केली होती. तरीही यावर्षी तळ्याचा डोह पाहायला मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, वनवासवाडीत एका अपार्टमेंटच्या तळमजल्यातल्या गाळ्यात पाणी शिरले होते. पहिल्याच पावसाने शहरात त्रेधा उडवून टाकली होती.
गेल्या चार दिवसापासून वातावरणात बदल झाल्याने तसेच हवामान खात्याने मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली गेल्याने शुक्रवारी दुपारी सातारा शहरात पावसाची एन्ट्री झाली होती. जोरदार स्वरुपाच्या पावसाने रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले होते. त्यामुळे राधिका रोडवरचे गटर नेहमीप्रमाणे ओव्हरफ्लो झाले. पाऊस कमी झाल्यावर गटरची घाण सगळी रस्त्यावर तशीच होती.
दरम्यान, बॉम्बे रेस्टॉरंट चौकात अलिकडच्या दोन चार वर्षात तळे बनण्याचा प्रकार होऊ लागला आहे. गतवर्षी या तळ्याच्या पाण्यात रिपाई एच्यावतीने कागदी होड्या सोडून आंदोलन केले होते. त्यानंतर भरही टाकून खड्डा भरुन घेतला होता. मात्र, पहिल्याच मान्सूनपूर्व पावसात तेथे तळे निर्माण झाले. तसेच वनवासवाडीतही एका अपार्टमेंटच्या तळमजल्यातही पाणी गेले होते. सातारकरांची पहिल्याच पावसाने तारांबळ उडाली.