इराणमध्ये आंदोलनाचा भडका
खामेनींविरुद्धच्या निदर्शनांना हिंसक वळण, 7 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणच्या कमकुवत होत चाललेल्या अर्थव्यवस्थेविरोधात सुरू झालेली व्यापक निदर्शने आता राजधानी तेहरानपासून ते देशाच्या ग्रामीण प्रांतांपर्यंत पसरली आहेत. या आंदोलनादरम्यान सुरक्षा दल आणि निदर्शकांमधील संघर्षात किमान सात जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी शुक्रवारी झाली. या घटनांमुळे इराणचे धार्मिक सरकार निदर्शने दडपण्यासाठी अधिक कठोर पावले उचलू शकते, अशी भीती निर्माण झाली आहे.
इराणमध्ये महागाई आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींविरुद्धची निदर्शने सलग सहाव्या दिवशीही सुरू आहेत. ही निदर्शने इराणच्या पवित्र शहर कोममध्ये पसरली आहेत. कोम शहर हे शिया धर्मगुरूंचा प्रमुख बालेकिल्ला आहे. इराण इंटरनॅशनलच्या मते, कडक सुरक्षा असूनही, निदर्शकांनी राजेशाहीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. 1 जानेवारी रोजी निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक संघर्ष झाल्यानंतर पाच जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी, 31 डिसेंबर रोजी निदर्शनादरम्यान झालेल्या गोळीबारात एक व्यक्तीही ठार झाला होता. निदर्शनांमध्ये आतापर्यंत सहा नागरिक आणि एका सुरक्षा दलाच्या सदस्याचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये निदर्शने 28 डिसेंबर रोजी सुरू झाली. सुरुवातीला राजधानी तेहरानमधील व्याप्रायांनी निदर्शने सुरू केली होती. आता हजारो जनरल झेड देखील यात सामील झाले आहेत.
खामेनी सरकारसमोर आव्हान
वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक निर्बंधांमुळे वाढलेला जनतेचा रोष आता उघडपणे बाहेर पडत आहे. जूनमध्ये इस्रायल आणि इराणमधील 12 दिवसांच्या युद्धानंतर देशाची आर्थिक आणि राजकीय परिस्थिती अधिक दबावाखाली आली आहे. हे आंदोलन इराणसाठी एक नवीन आव्हान म्हणून उदयास येत आहे.
तेहरानमधील निदर्शने काहीशी कमी झाली असली तरी, देशाच्या इतर भागांमध्ये विशेषत: ग्रामीण आणि आदिवासी भागात परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. इराणच्या लूर वांशिक गटाची लोकसंख्या जास्त असलेल्या शहरांमध्ये बुधवारी एक आणि गुरुवारी दोघांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. बख्तियारी प्रांतातील चहरमहल आणि लोराडगन शहरातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये निदर्शक रस्त्यावर जमलेले दिसत असून गोळीबाराचा आवाजही ऐकू येत आहे. हा परिसर तेहरानपासून सुमारे 470 किलोमीटर दक्षिणेस आहे.
2022 नंतरचे सर्वात मोठे आंदोलन
2022 नंतरचे हे आंदोलन इराणमधील सर्वात मोठे मानले जात आहे. 2022 मध्ये महसा अमिनीच्या पोलीस कोठडीतील मृत्यूमुळे देशभरात व्यापक निदर्शने झाली होती. सध्याचे आंदोलन अद्याप त्या पातळीपर्यंत पोहोचलेले नसले तरी, ते अजूनही सरकारविरोधी घोषणा आणि असंतोषाने भडकलेले दिसत आहे.
निदर्शकांना मदत करण्यास ट्रम्प तयार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी इराणला इशारा दिला. जर शांततापूर्ण निदर्शक मारले गेले तर अमेरिका कारवाई करण्यास पूर्णपणे तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले. ट्रुथ सोशलवर ट्रम्प यांनी इराणसाठी इशारा जारी केला. ‘जर इराणने शांततापूर्ण निदर्शकांवर गोळीबार केला किंवा त्यांना निर्घृणपणे मारले तर अमेरिका आंदोलकांच्या मदतीला येईल. आम्ही पूर्णपणे तयार आहोत.’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यापूर्वी, अमेरिकेने इराणी लष्करी तळांवर आणि अणु सुविधांवर हल्ला केला आहे. जून 2025 मध्ये, इराण आणि इस्रायलमध्ये 12 दिवसांचे युद्ध झाले, ज्यामध्ये अमेरिकेनेही भाग घेतला होता.