उचगाव हायवे पुलाखालील खड्ड्यांच्या निषेधार्त शिवसेना- ठाकरे गटाकडून जोरदार निदर्शने
उचगाव/वार्ताहर
करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उचगाव चौकात हायवे पुलाखालील खड्ड्यामध्ये हायवे प्रशासनाच्या निषेधाचे फलक घेवून निदर्शने करण्यात आली. सर्व हायवे पुलाखालील खड्यासह मुख्य रस्त्यावरील खड़डे बुजविण्यात यावेत यासाठी हायवे प्रशासनाच्या निषेध करत उचगाव, सरनोबतवाडी व उजळाईवाडी परिसरातील हायवे ठेकेदाराचा ही यावेळी निषेध करण्यात आला.
करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले , हायवे सहापदरीकरणाचे काम सातारा ते कागल चालु असून काम अगदी संथगतीने चालु आहे. मोठया पावसाने मुख्य हायवे वरती ही मोठे खड्डे पडले असून मोटर सायकलस्वार खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात घडत आहेत. उचगांव हायवे पुलाखाली मोठे खड़डे आणि त्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्या खड्ड्यांना तळ्यांचे स्वरूप आले असून अनेक महिला बाईक स्वारांचा त्या खड्ड्यात अपघात झाला आहे. म्हणून करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हायवे पुलाखालील खड़यामध्ये हायवे प्रशासनाच्या निषेधाचे फलक घेवून निदर्शने करण्यात आली. गणेश उत्सवापुर्वी हया रस्त्यावरून गणेश मुर्तीं ने आण करण्यात येत असतात पुलाखालील मोठमोठे खड्डे व तळ्यासारखे साचलेले पाणी त्वरित काढून रस्ता दर्जेदार व्हावा, मुख्य हायवे वरील खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी करत हायवे प्रशासनाचा निषेध करण्यात आला. उचगाव हायवे पुलाखालील प्रवास म्हणजे जीव घेणा प्रवास, टोलची वसुली फास्ट मात्र हायवे वरती खड्ड्यांचे साम्राज्य..., जन हो कशाला शोधताय जागा.. हायवेच्या खड्ड्यातच झाडे लावा....! निषेधाचे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी हायवे प्राधिकरणाचे अभियंता महेश पाटोळे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीकांत सुतार यांना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी जाब विचारत तात्काळ हायवे खालचे खड्डे बुजवून साचलेले पाणी काढून रस्ता खड्डे मुक्त झाला पाहिजे अन्यथा पुढील आंदोलन अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसवण्याचे आंदोलन असेल असा इशारा दिला. यावेळी उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, पोपट दांगट, विक्रम चौगुले यांनी जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
अधिकाऱ्यांनी तात्काळ काम करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले. यावेळी उपस्थित राजू यादव करवीर तालुकाप्रमुख, अवधूत साळोखे उपजिल्हाप्रमुख, पोपट दांगट उपजिल्हाप्रमुख, विक्रम चौगुले उपजिल्हा समन्वयक, विराग करी ग्रा.प. सदस्य, राहुल गिरूले उपतालुकाप्रमुख, संदीप दळवी, कैलास जाधव,बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, ,दिलीप सावंत , सचिन नागटिळक, अजित पाटील, अनिल माळी, शफिक देवळे, राजू राठोड, मनोहर आहुजा, बंडा पाटील, संजू कलकुटके, सुरज पाटील, दीपक फ्रेमवाला, दीपक धिंग, दीपक अंकल, सुनील पारपाणी, नागेश शिरवट्टे, अक्षय परीट, शशिकांत पाटील, दिलीप कारवेकर, सुभन्ना फुलवाले, अनिल जाधव आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गांधीनगर पोलीसांनी बंदोबस्त तैनात केला होता.