बांगलादेशच्या राजधानीत निदर्शनांवर बंदी
युनूस यांचे निवासस्थान-सचिवालय परिसरात प्रवेशबंदी : अंतरिम सरकारच्या अडचणी वाढल्या
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या विरोधातील निदर्शनांना तीव्रता मिळाली आहे. विरोधी पक्ष, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि सैन्यादरम्यान नाराजी वाढत चालली आहे. याचदरम्यान ढाका शहर पोलिसांनी राजधानीच्या केंद्रस्थानी सर्व रॅली, निदर्शने आणि जाहीरसभांवर अनिश्चितकाळापर्यंत बंदी घातली आहे. तर ढाका पोलिसांनी मोहम्मद युनूस यांचे अधिकृत निवासस्थान ‘जमुना गेस्ट हाउस’ आणि बांगलादेश सचिवालयाच्या आसपासच्या परिसरात प्रवेशबंदी लागू केली आहे. सचिवालयात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी सरकारच्या एका अध्यादेशाच्या विरोधात निदर्शने करत असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सार्वजनिक व्यवस्था आणि मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या सुरक्षेसाठी ही बंदी घालण्यात आल्याचे ढाका पोलीस आयुक्त एस.एम. सज्जात अली यांनी सांगितले आहे. यापूर्वी 10 मे रोजी अंतरिम सरकारने निमलष्करी दल आणि पोलिसांच्या स्वॅट टीम्सना शासकीय इमारतींच्या सुरक्षेकरता तैनात केले होते.
निदर्शने पुन्हा तीव्र होणार
ईदच्या काळात निदर्शने थांबली असली तरीही शासकीय कर्मचाऱ्यांनी 15 जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास देशभरात मोठे आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलन आणखी उग्र होणार असल्याचे बांगलादेश सचिवालय अधिकारी-कर्मचारी एकता मंचे सह-अध्यक्ष नुरुल इस्लाम यांनी म्हटले आहे.
सैन्य, बीएनपी नाराज, शिक्षक संपावर
ऑगस्ट 2024 पासून सत्तेची धुरा सांभाळत असलेले मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारला यापूर्वीच विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) निवडणुकीची कालमर्यादा निश्चित करण्याच्या मागणीवरून लक्ष्य केले आहे. तर सैन्यप्रमुख वाकर-उज-जमान यांनी देखील डिसेंबर 2025 पर्यंत देशात निवडणूक घेण्यात यावी असा सल्ला दिला आहे. तर युनूस यांनी एप्रिल 2026 मध्ये निवडणूक करविण्याचे संकेत दिले आहेत, यामुळे ते सत्तेवर कायम राहू इच्छित असल्याचा संशय बळावला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसोबत देशभरातील हजारो प्राथमिक शिक्षक देखील वेतनवाढ समवेत अनेक मागण्यांवरून बेमुदत संपावर गेले आहेत.
म्यानमार सीमेवरील कॉरिडॉर
बांगलादेशात म्यानमार सीमेवर रखाइन प्रांतात मानवी कॉरिडॉर निर्माण करण्याच्या कथित योजनेवरून सैन्य आणि सरकार आमने-सामने आहे. अंतरिम सरकारने अमेरिकेकडून प्रस्तावित रखाइन कॉरिडॉरवर सहमती व्यक्त केल्याची घोषणा बांगलादेशचे विदेश सल्लागार तौहीद हुसैन यांनी केली होती. यावर सैन्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सैन्यप्रमुख वकार यांनी या कॉरिडॉरला ‘रक्ताने माखलेला’ संबोधिले होते. तसेच देशाच्या सार्वभौमत्वासाठी हानिकारक असलेल्या कुठल्याही कृत्यात बांगलादेशचे सैन्य सामील होणार नसल्याचे म्हणत सैन्यप्रमुखांनी मोहम्मद युनूस यांना इशारा दिला होता. यानंतर युनूस सरकारने युटर्न घेत कुठल्याही देशासोबत कॉरिडॉरसंबंधी करार केला नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.