निदर्शनांचे लोण आता टेक्सासमध्येही
अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये भडकला हिंसाचार
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या स्थलांतरितांसंबंधातील धोरणांचा विरोध करण्यासाठी अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये आता आंदोलन होत आहे. प्रथम लॉस एंजल्स, नंतर न्यूयॉर्क आणि आता ट्रंप यांचा बालेकिल्ला असणाऱ्या टेक्सासमध्येही आंदोलन भडकले आहे. लॉस एंजल्स आणि न्यूयॉर्कमध्ये अनेक आंदोलकांनी स्वत:च्या कार्सना आग लावत अनोख्या पद्धतीने हे आंदोलन केले.
टेक्सासमध्येही आता आंदोलन होत आहे. अमेरिकेत बेकायदा घुसलेल्या स्थलांतरितांना बाहेर काढण्यात येईल, अशी घोषणा ट्रंप यांनी सत्तेवर आल्यानंतर केली होती. त्यांना मतदारांना निवडणूक प्रचारकाळात तसे आश्वासनही दिले होते. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या स्थलांतरितांसंबंधींच्या धोरणात व्यापक परिवर्तन केले आहे. तसेच विदेशी विद्यार्थ्यांवर अनेक बंधने ही घातली आहेत. त्यांच्या कठोर धोरणांच्या विरोधात आता लोक रस्त्यावर उतरले असून अनेक शहरांमध्ये आंदोलनांना हिंसक वळणही लागले आहे. लॉस एंजल्समधील हिंसाचार आणि जाळपोळ नियंत्रणात आणण्यासाठी ट्रंप यांनी राष्ट्रीय सुरक्षा सेनेच्या तुकड्या पाठविण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, या निर्णयाला डेमॉव्रेटिक पक्षाने विरोध केला असून अध्यक्षांना प्रांतीय प्रशासनाची अनुमती घेतल्याशिवाय अशी सेना पाठविण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन केले होते. हे प्रकरण न्यायालयात जाण्याचीही शक्यता आहे. ट्रंप मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत.
आंदोलकांचे म्हणणे काय आहे
अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्थलांतरीतांसंबंधीच्या धोरणात परिवर्तन करु नये, अशी आंदोलकांची मागणी आहे. विद्यार्थ्यांनी चालविलेल्या विविध विषयांवरील आंदोलनांवरही ट्रंप प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. ते मागे घ्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनांना आता राजकीय रंगही मिळताना दिसत आहे. ज्या प्रातांमध्ये डेमॉव्रेटिक पक्षाची सत्ता आहे, तेथे आंदोलनाचा जोर अधिक असल्याचेही दिसून येते. ही आंदोलने प्रामुख्याने स्थलांतरितांकडून केली जात असली, तरी त्यांना स्थानिक अमेरिकन लोकांचाही पाठिंबा मिळताना दिसून येतो. तथापि, ट्रंप यांनी आपली धोरणे अमेरिकेचे हित आणि अमेरिकेची सुरक्षा यांच्या व्यापक सुनिश्चितेसाठी असल्याची भूमिका ठासून मांडली आहे.