वक्फ कायद्याविरोधात प. बंगालमध्ये पुन्हा उद्रेक
हिंसाचारात एका अल्पवयीन मुलासह तिघांचा मृत्यू : मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शमशेरगंज भागात वक्फ कायद्यावरून पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. घटनास्थळी तणाव असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांकडून देण्यात आली. हिंसाचारावेळी 21 वर्षीय तरुण आणि 12 वर्षीय मुलगा गोळीबारात जखमी झाले. दोन्ही जखमींना तात्काळ जंगीपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
वक्फ कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत 118 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी, या घटनेत 15 पोलीस आणि 10 लोक जखमी झाले. पोलिसांनी लोकांना ‘सोशल मीडियावरील अफवांकडे लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे.
ममता बॅनर्जी यांनी मौन सोडले
वक्फ कायद्यावरून मुर्शिदाबाद जिह्यात हिंसाचार उसळल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये त्यांनी सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र राहण्याचे आणि हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी, आपले सरकार या कायद्याला पाठिंबा देत नाही आणि राज्यात सदर कायदा लागू करणार नाही, असेही ममतांनी स्पष्ट केले. तसेच या उद्रेकाला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. धर्माच्या नावाखाली कोणतेही चुकीचे काम करू नका. जे हिंसाचार भडकावत आहेत ते समाजाचे नुकसान करत आहेत. वक्फ कायदा राज्य सरकारने बनवला नाही तर केंद्र सरकारने बनवला आहे. त्यामुळे लोकांनी केंद्राकडे आपली नाराजी व्यक्त करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्याच्या विरोधात निदर्शने सुरू असताना रेल्वे स्थानकांवर झालेल्या तोडफोडीबद्दल विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर रेल्वे स्थानकांचे नुकसान करणे हे केवळ रेल्वेसेवा थांबवण्यापुरते मर्यादित नाही तर ते सार्वजनिक सुरक्षितता आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी देखील धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एनआयए चौकशीची मागणी
सुवेंदू अधिकारी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून या घटनांची राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बाधित रेल्वेस्थानकांवर झालेल्या तोडफोडीच्या घटना गांभीर्याने घ्याव्यात आणि तपास एनआयएकडे सोपवावा अशी विनंती त्यांनी केली.