वैष्णोदेवी रोपवे प्रकल्प विरोधी निदर्शने स्थगित
उपराज्यपालांशी चर्चेनंतर कामावर परतले निदर्शक : 15 डिसेंबरपर्यंत होणार नाही विरोध
► वृत्तसंस्था/ कटरा
जम्मू-काश्मीरच्या कटरामध्ये वैष्णोदवी प्रकल्पाला होणारा विरोध हा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारशी चर्चा आणि उपराज्यपालांच्या आश्वासनानंतर मावळला आहे. स्थानिक प्रशासनाने विरोध करणारे खच्चर आणि पालखीवाल्यांशी मंगळवारी चर्चा केली. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडून त्यांना आश्वासन देण्यात आले आहे.
संबंधितांच्या चिंतांवर तोडगा काढला जाणार असल्याचे रियासीचे उपायुक्त विनेश महाजन यांनी सांगितल्यावर खच्चर आणि पालखीवाल्यांनी 15 डिसेंबरपर्यंत स्वत:ची निदर्शने रोखली आहेत. चर्चेदरम्यान माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे प्रतिनिधीही उपस्थित राहिले.
यापूर्वी 22 नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या दुकानदार, खच्चर आणि पालखीवाल्यांचा संपाने सोमवारी हिंसक रुप धारण केले होते. पोलिसांनी निदर्शकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता जमावाने दगडफेक सुरू केली होती. हिंसक निदर्शनांमध्ये काही लोक जखमी देखील झाले होते.
कमाईवर होणार परिणाम
वैष्णोदेवी श्राइन बोर्ड भाविकांना मंदिरात सुलभपणे जाता यावे याकरता कटरामध्ये ताराकोट मार्ग आणि सांझी छतदरम्यान 12 किलोमीटरच्या मार्गावर 250 कोटी रुपयांच्या निधीतून रोपवेची निर्मिती करत आहे. तर आतापर्यंत वैष्णेदेवीला येणाऱ्या भाविकांना खच्चर आणि पालखीवालेच मंदिर दर्शन करविण्यासाठी नेत होते. हा त्यांच्या कमाईचा स्रोत होता. याचमुळे ते रोपवे प्रकल्पाला विरोध करत आहेत.
भाविकांच्या सुविधेसाठी प्रकल्प
यापूर्वी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी निर्माणाधीन जम्मू तावी रिव्हरफ्रंट प्रकल्पस्थळाचा दौरा केला होता. याचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून जानेवारीपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा असल्याचे सिन्हा यांनी म्हटले होते. तर श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाकडून घोषित रोपवे प्रकल्पाचा उद्देश भाविकांसाठी वेगवान आणि सुरक्षित यात्रा प्रदान करणे असल्याचे सिन्हा यांनी निदर्शनांबद्दल म्हटले होते.
20 लाख रुपयांच्या भरपाईची मागणी
रोपवे प्रकल्पाच्या विरोधात चार दिवसांपर्यंत चाललेल्या निदर्शनात मजदूर संघाचे अध्यक्ष भूपिंदर सिंह जामवाल आणि शिवसेना (उबाठा)चे प्रदेशाध्यक्ष मनीष साहनी देखील सामील. रोपवे प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला 20 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच प्रभावित लोकांसाठी पुनर्वसन आराखडा तयार करण्यात यावा असे म्हटले आहे.
चालू वर्षात 86 लाख भाविक दाखल
वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी चालू वर्षात ऑक्टोबरपर्यंत 86 लाखाहून अधिक लोक पोहोचले आहेत. हा आकडा 1 कोटीहून अधिक होणार असल्याचे श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर मागील वर्षी 95 लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले होते.