वक्फ कायद्याविरोधात मोर्चे-निदर्शने
वेगवेगळ्या शहरांमध्ये मुस्लीम संघटनांचा विरोध : कोलकात्यात विद्यार्थ्यांचा मोर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवीन वक्फ कायद्याविरोधात देशातील अनेक राज्यांमध्ये निदर्शने होत आहेत. पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, मुंबई, श्रीनगरसह अनेक राज्यांमध्ये मुस्लीम संघटनांचे कार्यकर्ते या कायद्याविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. शुक्रवार, 11 एप्रिल रोजी कोलकाता येथील आलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी नवीन वक्फ कायद्याविरुद्ध रॅली काढत तो मागे घेण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये मोर्चा काढत घोषणाबाजीही केली. या आंदोलनामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.
देशातील अनेक शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर वक्फ कायद्याविरोधात निदर्शने झाली. वक्फ कायद्याला आपल्या हक्कांवर हल्ला मानून निषेध नोंदवण्यासाठी मुस्लीम संघटना आणि समुदायातील लोक रस्त्यावर उतरले होते. मुंबई, कोलकाता, पाटणा आणि लखनौ सारख्या शहरांमधून निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी निदर्शकांनी सरकारवर धार्मिक अधिकारांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे.
मुंबईतील भायखळा येथील चिश्ती हिंदुस्तानी मशिदीबाहेर निदर्शकांनी शांततेत आपला निषेध व्यक्त केला. नमाज पठणाच्या वेळी अनेकांनी हातावर काळ्या पट्ट्या बांधून आपली असहमती व्यक्त केली. एआयएमआयएम नेते वारिस पठाण हेही या निषेध आंदोलनात सामील झाले. यावेळी निदर्शक घोषणाबाजी न करता उभे राहून हातात निषेधाचे फलक घेऊन उभे होते.
कोलकातामध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये आलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कायद्याच्या निषेधार्थ विद्यापीठापासून पार्क सर्कलपर्यंत मोर्चा काढला. विद्यार्थ्यांनी सरकारवर वक्फ मालमत्तांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. तसेच हा कायदा मागे घेण्याची मागणी केली. पाटणा आणि लखनौमध्येही निदर्शने करण्यात आली. तेथे स्थानिक मुस्लीम नेत्यांनी नवा वक्फ कायदा सरकारने मागे घेतला नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा दिला.
दिल्लीतही असंतोष
दिल्लीच्या जामा मशिदीत नमाज शांततेत पार पडला. त्यानंतर मुस्लीम संघटनांच्या सदस्यांनी वक्फ कायद्यावर नाराजी व्यक्त केली. कायद्यातील बदलामुळे मुस्लीम समुदायाचे धार्मिक आणि धर्मादाय मालमत्तांवरील अधिकार कमकुवत होऊ शकतात, असे मत नोंदवण्यात आले. तसेच सरकारने या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली.
इतर शहरांमध्येही निषेधांची लाट
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील इमामबाडाच्या शिया समुदायाच्या लोकांनी वक्फ कायद्याविरुद्ध निदर्शने केली आहेत. शुक्रवारच्या नमाजानंतर शिया धार्मिक नेते कल्बे जवाद यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्ध घोषणा लिहिलेले फलक हातात धरलेले पाहिले. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मुस्लीम समुदायाने एकत्र येऊन वक्फ कायद्याविरोधात शांततापूर्ण निदर्शने केली. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. काळ्या पोशाखात आलेल्या निदर्शकांनी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत सेंट्रल लायब्ररीसमोर शांततापूर्ण निदर्शने केली. या काळात त्यांनी कोणताही राजकीय झेंडा फडकवला नाही किंवा कोणत्याही विशिष्ट पक्षाला पाठिंबा दिला नाही.
जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीकडून निषेध
जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीने शुक्रवारी श्रीनगरमध्ये वक्फ कायद्याविरुद्ध निदर्शने केली. केंद्र सरकार मुस्लिमांना बाजूला ठेवण्यासाठी याचा वापर करत असल्याचा आरोप पक्षाने केला. हातात फलक घेऊन निदर्शकांनी आंदोलन छेडले. शहराच्या मध्यभागी आंदोलन करण्यासाठी कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर आले तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही त्यांनी निदर्शने सुरूच ठेवली.