रमेश कत्ती यांच्याविरोधात निदर्शने
वाल्मिकी समाजाबद्दल वादग्रस्त विधान : दोन दिवसांत रमेश कत्ती यांना अटक करण्याची मागणी
बेळगाव : माजी खासदार रमेश कत्ती यांनी रविवारी वाल्मिकी समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. याच्या निषेधार्थ सोमवारी वाल्मिकी समाज, विविध दलित संघटना, मागासवर्गीय संघटनांच्या नेतृत्वाखाली राणी चन्नम्मा सर्कलमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनादरम्यान टायर पेटवून रमेश कत्ती यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. तसेच येत्या दोन दिवसांत जर रमेश कत्ती यांना अटक करण्यात आली नाहीतर 24 ऑक्टोबर रोजी बेळगाव जिल्हा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला.
डीसीसी बँक निवडणुकीदरम्यान रमेश कत्ती यांनी समर्थकांशी बोलताना वाल्मिकी समाजाबद्दल वादग्रस्त विधान केल्याची क्लिप व्हायरल झाली. यानंतर कॅम्प पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला. क्लिप सर्वत्र व्हायरल झाल्याने याचे पडसाद जिल्ह्याभरात उमटले असून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. तसेच रमेश कत्ती यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
सोमवारी सकाळी विविध संघटनांच्यावतीने राणी चन्नम्मा सर्कलमध्ये रमेश कत्ती यांचा निषेध करण्यात आला. रमेश कत्ती यांच्याविरोधात घोषणाबाजी करत टायर पेटवून निदर्शने करण्यात आली. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली. यावेळी समाजप्रमुख व बांधवांनी पोलिसांना दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला असून याकाळात रमेश कत्ती यांना अटक न केल्यास 24 ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन करून बेळगाव जिल्हा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला.