For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंदोलक चिंबलवासियांना आता राज्यभरातून पाठिंबा

12:56 PM Jan 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
आंदोलक चिंबलवासियांना आता राज्यभरातून पाठिंबा
Advertisement

‘गाकुवेध’ही उतरली आंदोलनात

Advertisement

पणजी : कदंब पठारावरील तोयार तळ्याच्या परिसरात सरकारकडून उभारण्यात येणाऱ्या युनिटी मॉलच्या विरोधात चिंबल आणि परिसरातील ग्रामस्थांनी आरंभलेल्या आंदोलनाला आता राज्याच्या विविध भागातून आणि विविध समाज संघटनांकडूनही वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. त्यामुळे गेल्या 22 दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन आता अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. पाठिंबा देणाऱ्या लोकांमध्ये प्रामुख्याने भोम, कोडार-खांडेपार आदी भागातील ग्रामस्थ, गाकुवेध (गावडा, कुणबी, वेळीप, धनगर संघटना), चिंबल जैवविविधता व्यवस्थापन समिती आणि समुदायाचे सदस्य, यांचा सहभाग आहे. प्रमुख समर्थकांमध्ये रामकृष्ण जल्मी, नीलेश गावडे, देवानंद गावडे, नामदेव फातर्फेकर, उज्वला गावकर, हर्षा वाडकर, जॉन नाझरेथ आदींचा समावेश आहे.

विधानाचे स्वागत, पण प्रकल्प नकोच

Advertisement

तोयार तळ्याच्या भागातील जल, वन आणि जमीन जतन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी स्वागत केले आहे. मात्र हे प्रकल्प उभारल्यास भविष्यात तळ्याच्या परिसराचे संरक्षण होणार नाही, अशी भीतीही व्यक्त केली आहे. त्यामुळे सदर प्रस्तावित दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची विनंती शिरोडकर यांनी केली आहे. गोव्याचा पर्यावरणीय ऱ्हास आम्ही कदापी सहन करणार नाही, अशी प्रतिज्ञाही या आंदोलकांनी केली आहे.

राजधानीपासून जवळच असलेल्या कदंब पठारावर तोयार तळ्याच्या भागात हे सरकारपुरस्कृत युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ असे दोन मेगा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या दोन्ही प्रकल्पांना स्थानिकांचा जोरदार विरोध होत असून गेल्या 22 दिवसांपासूनत्यांना आंदोलन उभारलेले आहे. दोन दिवसांपूर्वीच विधानसभा अधिवेशन काळात या ग्रामस्थांनी राजधानीत महामोर्चा आयोजित करून चक्काजामही केला होता.

त्यावेळी रात्री उशिरा स्वत: मुख्यमंत्र्यांनी या आंदोलकांची भेट घेऊन समजूत काढण्याचे प्रयत्न केले होते. परंतु त्यातून सरकार आपल्या निर्धारापासून माघार घेत नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता चित्र बदलू लागले असून आंदोलनकर्त्यांना राज्यभरातील विविध गावे, संघटना आणि व्यक्तींकडून व्यापक पाठिंबा मिळू लागला आहे. एकप्रकारे या प्रकल्पाविरोधात गावागावात संतापाचा वणवा पेटू लागला आहे.

Advertisement
Tags :

.