मडगावात आंदोलकांची माघार
आंदोलनाला रविवारी अल्प प्रतिसाद : प्रतिमासह अनेकांवर गुन्हे नोंद
मडगाव : सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी करत दक्षिण गोव्यात गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन छेडण्यात आले. मात्र, काल रविवारी तिसऱ्या दिवशी या आंदोलनाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तसेच रस्ता रोको केल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. यावेळी पोलिसांनी छायापत्रकार संतोष मिरजकर याच्यावर लाठी मारल्याने पत्रकारांनी या घटनेचा निषेध केला आहे.
शुक्रवारी व शनिवारी जसा आंदोलनाला पाठिंबा मिळाला होता तसा पाठिंबा रविवारी मिळाला नाही. त्यात चर्चसहीत क्लाऊड आल्वारीस, डॉ. ऑस्कर रिबेलो तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याची हाक दिली होती. त्याचा आदर करीत आंदोलन मागे घेण्याची घोषणा प्रतिमा कुतिन्हो यांनी केली. आंदोलन मागे घेतले तरी गोव्याशी निगडीत विषयावर आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काल रविवारी आंदोलक कोलवा सर्कलजवळ एकत्र आले, तेव्हा त्यांना रस्त्यावर येण्यास पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी तीव्र हरकत घेतली. जर कुणी रस्त्यावर उतरला तर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रतिमा कुतिन्हो या केपेचे उपअधीक्षक नीलेश राणे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पुढे गेल्या व सुभाष वेलिंगकरांना अटक केली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच पोलिस भूतानी व इतर प्रकल्पांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला. यावेळी उपअधीक्षक राणे व प्रतिमा यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. राणे यांचा संयम जवळपास संपला होता. ते कृती करणार असे वाटत असतानाच अधीक्षक संतोष देसाई त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मध्यस्थी करत प्रतिमाला बाजूला केल्याने प्रकरण शांत झाले.
या आंदोलनातून काहींचा राजकीय मायलेज घेण्याचा डाव लक्षात येताच एका गटाने आंदोलनातून माघार घेतली. शनिवारच्याप्रमाणे, कुणीही राजकीय नेते याठिकाणी फिरकले नाही. शनिवारी दिवसभर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याबद्दल फातोर्डा पोलिसांनी प्रतिमा कुतिन्हो, तिचे पती सावियो कुतिन्हो तसेच इतरांवर गुन्हा नोंद केला आहे.
दोन दिवस लोकांची गैरसोय
शुक्रवारी संध्याकाळी सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात तक्रार नोंद करण्यासाठी प्रतिमा कुतिन्हो यांनी सर्वांना मडगाव पोलीस स्थानकात बोलावले आणि नंतर वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी लावून धरली. यावेळी मोठ्या संख्येने ख्रिस्ती लोक एकत्र आले होते. नंतर शनिवारी पुन्हा आंदोलक एकत्र आले आणि वेलिंगकर यांना अटक करावी, अशी मागणी करून फातोर्डा परिसरात आंदोलन केले. शनिवारी दिवसभर फातोर्डा परिसरातील सर्व प्रमुख रस्ते आंदोलकांनी बंद केले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची प्रचंड गैरसोय झाली. आंदोलकांनी लोकांना शिव्या दिल्या, दगडफेक झाली तसेच अंगावर धावून गेल्याच्याही तक्रारी आल्या.
आंदोलकांनी हाती घेतला कायदा
आंदोलकांनी दुचाकी चालकाला मारहाण करताना कायदा हातात घेतला. सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने पर्यटक, विद्यार्थी-पालक यांची तसेच इस्पितळात जाणाऱ्या रूग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांना बराच त्रास सहन करावा लागला. त्यामुळे या आंदोलनाबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शनिवारी रात्री आंदोलकांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले व रविवारी पुन्हा कोलवा सर्कलजवळ एकत्र येण्याची घोषणा केली.
पोलिसांचा लाठीचार्ज
शनिवारी आंदोलन तात्पुरते मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतरही काहीजण रस्ता अडवून धरण्याचे प्रयत्न करू लागले. वाहनांवर दगड मारण्यापर्यंत काहींनी मजल गाठली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलकांना पांगवून लावले. काहीजणांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.
पोलिसांकडून पत्रकारांवरही लाठीचार्ज
लाठीचार्ज सुरू असताना त्याचे चित्रिकरण करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी चित्रिकरण डिलीट करण्याची सूचना केली. यावेळी संतोष मिरजकर या छायापत्रकाराने आपले ओळखपत्र पोलिसांना दाखवून छायाचित्रे व व्हिडिओ रिकॉर्डिंग हे वृत्तपत्रासाठी असून ते का डिलिट करावे असा सवाल उपस्थित केला. यावेळी पोलिसांनी त्याच्यावरही लाठीचार्ज केला. पत्रकार आपली ड्युटी बजावत असताना, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने पत्रकार संघटनेने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे चर्चा करण्यात आली असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.