For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंदोलकांना मिळाला ‘सर्वोच्च’ इशारा

06:45 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
आंदोलकांना मिळाला ‘सर्वोच्च’ इशारा
Advertisement

आंदोलनस्थळी अनिश्चित काळासाठी कब्जा नाही

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोणताही व्यक्ती, गट किंवा संघटना यांना एका आंदोलनस्थळी अनिश्चित काळासाठी आंदोलन करता येणार नाही, असा स्पष्ट इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. रविवारी दिल्लीत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केलेल्या आंदोलनासंबंधीच्या याचिकांवर मंगळवारी सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी हा इशारा दिला. विरोधी पक्षांचा मोर्चा आणि सभा यामुळे दिल्लीच्या व्यापाऱ्यांचे दीपावलीचा सण ऐन तोंडावर आलेला असताना हजारो कोटी रुपयांची हानी झाली. त्यामुळे दिल्लीतील आंदोलने थांबवावीत, अशी मागणी करणाऱ्या काही याचिका व्यापारी संघटनांनी सादर केल्या आहेत. या याचिकांवर ही सुनावणी होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकांवर उत्तर देण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला.

Advertisement

व्यापारी संघटनांच्या याचिकांसह आंदोलनांच्या समर्थकांनीही याचिका सादर केल्या आहेत. पोलिसांकडून होणारी धरपकड, पोलीस लाठीमार आणि बळाचा उपयोग, मेट्रो स्थानके बंद करण्याचा एकांगी आदेश देणे, आदी आरोपांसंबंधीही याचिका सादर करण्यात आल्या असून सर्वांची एकत्र सुनावणी केली जात आहे.

व्यापारी संघटनांचा युक्तीवाद

दिल्लीच्या ‘किराणा समिती’च्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहटगी यांनी युक्तीवाद केला. रविवारचा मोर्चा आणि आंदोलन यामुळे व्यापाऱ्यांची मोठी हानी झाली. दिल्लीच्या व्यापारी भागातच मोर्चे काढले जातात. त्यामुळे दुकाने बंद ठेवावी लागतात. या व्यापारी भागाच्या परिसरात 50 लाख नागरीक वास्तव्य करतात. या नागरीकांच्या खरेदीवर या व्यापाऱ्यांचे भवितव्य अवलंबून असते. आंदोलनांमुळे लोक खरेदीसाठी घराबाहेर पडत नाहीत. अशा प्रकारची हानी घडविणाऱ्या आंदोलनांवर कुठेतरी चाप बसला पाहिजे, अशी मागणी त्यांनी युक्तीवादात केली.

कालावधी निधारीत करणे आवश्यक

कोणताही व्यक्ती, गट किंवा संघटना यांना कोणत्याही आंदोलनस्थळाचा ताबा अनिश्चित काळासाठी घेता येणार नाही. तसे झाल्यास इतर आंदोलकांनी कुठे जायचे ? शेतकरी, पत्रकार आदी अनेकांना त्यांच्या त्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करायची असतात. आंदोलने करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक आंदोलनासाठी एक निश्चित कालावधी निर्धारीत केला पाहिजे. आंदोलकांनी या कालावधीत आंदोलन संपविले पाहिजे. तसा नियम केला पाहिजे. अशी टिप्पणी रोहटगी यांच्या युक्तीवादावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केली.

संबंधितांना प्रतिवादी करा

व्यापारी संघटनांनी सर्व संबंधित आंदोलक संघटना, व्यक्ती आदींना याचिकेत प्रतिवादी करण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांची बाजू ऐकून घेतल्याखेरीज न्यायालय या प्रकरणी निर्णय देऊ शकणार नाही, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. सर्व संबंधितांना प्रतिवादी करण्यात येईल, असे प्रतिपादन रोहटगी यांनी केले. न्यायालयाने मंगळवारी आंदोलकांच्या समर्थकांच्या याचिकांसंबंधीचे युक्तीवादही ऐकून घेतले. आंदोलने करण्याचा अधिकार असला, तरी सर्वसामान्यांच्या अधिकारांचा विचार करणे आवश्यक असते. या संबंधात एक समतोल साधण्याची आवश्यकता आहे. आंदोलनस्थळाच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरीकांचे अधिकारही महत्वाचे असतात, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. या नंतर न्यायालयाने केंद्र सरकारला प्रतिसाद देण्यासाठी नोटीस पाठविण्याचा आदेश दिला. पुढची सुनावणी दोन आठड्यांच्या नंतर होणार आहे.

समतोल साधण्याची आवश्यकता

ड आंदोलकाचा अधिकार असला, तरी इतरांचे अधिकारही तितकेच महत्वाचे

ड आंदोलकांचे अधिकार आणि सर्वसामान्यांचे अधिकार यांच्यात समतोल हवा

ड रविवारचा मोर्चा आणि सभेमुळे व्यापाऱ्यांची हजारो कोटी रुपयांची हानी

Advertisement
Tags :

.