कुडाळात आमदार अबू आझमींच्या पुतळ्याला जोडे मारत निषेध
वार्ताहर/कुडाळ
समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेबाचे उदात्तीकरण करुन छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला. अबू आझमी यांनी औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हटले होते.त्यामुळे त्यांनी केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण देशभरासह सिंधुदुर्ग जिह्यातही त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज आज कुडाळ येथे एकवटला.औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. तसेच आझमींचा प्रतिकात्मक पुतळा पायाने तुडवून हातात फलक दाखवून आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.कुडाळ येथील राजमाता जिजामाता चौकात शुक्रवारी सकाळी सकल हिंदू समाजाने एकत्र येत अबू आझमींचा निषेध केला. आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करीत, पुतळा पायदळी तुडवत आझमींच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.' हिंदू धर्म की जय', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'हर हर महादेव' 'छत्रपती संभाजी महाराज की जय' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.यावेळी विवेक पंडित, रमाकांत नाईक, गणेश भोगटे, मंगेश चव्हाण, सुविनय दामले, प्रसाद नातू, अजय शिरसाट, बबन घुर्ये, अमेय शिरसाट, स्वरूप वाळके, लक्ष्मीकांत राणे, आनंद सावंत, रेवती राणे, सर्वेश पावसकर, प्रसन्ना गंगावणे, काशिनाथ निकम, महेश राऊळ, शिवम म्हाडेश्वर, यश मोहीते, आनंद वारंग, स्वप्नील तेली, संतोष परब, सागर वालावलकर आदी सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.