मुख्यमंत्री भेटीनंतरही आंदोलकांचा निर्धार कायम
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन : माझ्या आरोग्यापेक्षा गोव्याचे आरोग्य महत्त्वाचे : बोरकर,विरोधक, एनजीओ, लोकांना सहभागी होण्याचे आवाहन
पणजी : जो पर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत आंदोलन आणि उपोषण सुऊच राहणार असल्याचे आमदार विरेश बोरकर यांनी काल मंगळवारी रात्री पत्रकारांसमोर स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी आपली भेट घेतली आणि आरोग्य बिघडत असल्याने काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे आपणास सांगितले. परंतु आपल्या आरोग्यापेक्षा गोव्याचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. पण आज खऱ्या अर्थाने ते बिघडत चाललेले आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या चार प्रमुख मागण्या ऐकून घेतल्या, पण कोणतेही आश्वासन दिले नाही. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुऊच राहणार असल्याचा पुनरुच्चार आमदार बोरकर यांनी केला.
आज गोव्याचे आरोग्य बिघडत चाललेले आहे. गोमंतकीयांना सर्वच बाजूनी विविध धोक्यांनी घेरलेले आहे. गोव्याचे बिघडते आरोग्य थांबवण्यासाठी आमचा लढा आहे. या लढ्यात आम्हाला सर्वांनी मदत करावी. सर्व विरोधी पक्ष, बिगर सरकारी संस्था, आणि लोकांनी एकत्र येऊन हा लढा लढूया आणि आमचे गोवा राज्य वाचवूया, असे आवाहन आमदार बोरकर यांनी यावेळी केले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बोरकर यांनी स्पष्ट केले की आंदोलन सुरुच राहणार आहे. त्यानुसार रात्रभर आंदोलक आझाद मैदानावर ठाण मांडून होते. बोरकर यांनी आपले उपोषण आझाद मैदानावर सुरुच ठेवले आहे.
पाचव्या दिवशीही मंत्री राणे यांचा निषेध सुरुच
काल मंगळवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता. आंदोलकांची संख्या लक्षणीय होती. नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांचा निषेध करणे आंदोलकांनी सुरुच ठेवल्याचे दिसून आले. राणे यांच्या विरोधात दिवसभर घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात मुलांपासून युवक आणि वयोवृद्ध लोकांचा सहभाग आहे. अधिकाधिक महिलांचाही सहभाग दिसून आला. “आमचा गाव वाचविण्यासाठी 39 अ कलम रद्द करण्याची बुद्धी देव विश्वजित राणे यांना देवो” असे गाऱ्हाणे घालण्यात आले. फुगडीच्या माध्यमातूनही राणे यांचा निषेध करण्यात आला.
नगरनियोजन कायद्यातील कलम 39 (अ) रद्द करा व आमदार विरेश बोरकर यांना फरफटत नेणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करा, या दोन मागण्यांसाठी पाळे-शिरदोण ग्रामस्थांनी आझाद मैदानावर शुक्रवारपासून सुऊ केलेल्या आंदोलनाने सोमवारी उग्रऊप धारण केले होते. आंदोलकांनी थेट विश्वजित राणेंच्या बंगल्यावर धडक दिली. मात्र मंत्री आंदोलकांना भेटलेच नाही त्यामुळे तोडगा निघाला नाही सोमवारी रात्री उशिरापर्यंत आंदोलक मंत्री विश्वजित राणेच्या बंगल्याबाहेर ठाण मांडून राहिले. त्यानंतर मंगळवारी सकाळी आंदोलक पुन्हा आझाद मैदानावर आले.
डिस्चार्ज मिळतात बोरकर पुन्हा आझाद मैदानावर
शुक्रवारपासून उपोषणास बसलेल्या आमदार विरेश बोरकर यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने सोमवारी रात्री उशिरा त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून दिवसाला किमान तीन लिटर पाणी पिण्याचा सल्ला त्यांना दिला. मंगळवारी सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर ते परत थेट आझाद मैदानावर येऊन आंदोलनात सहभागी झाले.
आमदार विरेश बोरकर यांना भेटले मुख्यमंत्री, पण तोडगा नाही
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासह काल मंगळवारी सायंकाळी उशिरा आझाद मैदानावर जाऊन उपोषणास बसलेले आरजीपीचे आमदार विरेश बोरकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. एकूण 18 मिनिटे झालेल्या बोलणीत विरेश बोरकर यांनी सगळे मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. मुख्यमंत्र्यांनी सर्व ऐकून घेतले, पण त्यांना कोणतेही आश्वासन दिले नाही. त्यामुळे ठोस असे काहीच घडलेले नसल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, आमदार विरेश बोरकर यांच्या तब्येतीत काल बिघाड झाल्याची माहिती आपल्याला मिळाली. त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी आपण आलो होतो. बोरकर यांनी जे मुद्दे आपल्याकडे मांडले आहेत त्याबाबत आपण नक्कीच सकारात्मक विचार करणार आहे. योग्य जागेवर योग्य निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे बोरकर यांनी आपले मुद्दे विधानसभा अधिवेशनात मांडावे, त्यावेळी निर्णय घेतला जाईल.
मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की तूर्त आमदार बोरकर यांना आपण आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. ते नक्की विचार करून आंदोलन मागे घेतील असा विश्वास आहे. ज्या पोलिसांनी आमदार बोरकर यांना फरफटत टीसीपी कार्यालयाबाहेर काढले होते, त्या पोलिसांवर कारवाई केली का? असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले.
बोरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडलेल्या मागण्या
- नगरनियोजन कायद्यातील कलम 39 अ ताबडतोब रद्द करावे.
- जमीन ऊपांतरण तरतूद रद्द करण्यासाठी मंत्रीमंडळात ठराव घ्यावा.
- या संदर्भात न्यायालयात लवकर प्रतिज्ञापत्र दाखल करावे.
- ही दुऊस्ती रद्द करण्यासाठी विधानसभेत विधेयक मंजूर करावे.
मनोज परब यांचा विजय सरदेसाईंवर घणाघात
विश्वजित राणे यांच्या कृत्यात सरदेसाईंचा वाटा असल्याची टीका
सोमवारी आंदोलकांनी नगरनियोजनमंत्री विश्वजित राणेंच्या बंगल्यावर मोर्चा नेला. त्यावेळी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी मोर्चात सहभागी होण्यास नकार दिला होता. शिवाय मोर्चा पुढे नेण्यासही त्यांनी आंदोलनाच्या नेत्यांना नकार दिला होता, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यानंतर आंदोलकांत आणि पत्रकारांमध्येही त्यांच्या या भूमिकेवरुन सोमवारी जी चर्चा सुरु झाली होती ती मंगळवारी आणखी व्यापक स्वरुपात सुरु होती. त्यामुळे आरजीचे प्रमुख मनोज परब आणि आमदार सरदेसाई यांच्यात नवा वाद निर्माण झाला आहे.
मनोज परब यांनी विजय सरदेसाई यांच्यावर जोरदार टीका करीत म्हणाले...
- सर्व एकाच माळेचे मणी असून विश्वजित राणेंच्या कृत्यात विजय सरदेसाई यांचाही वाटा आहे.
- विजय सरदेसाई केवळ लोकांना दाखविण्यासाठी आंदोलनात सहभागी झाल्याचे नाटक करीत होते.
- राज्यात जमीन रूपांतरणाची सुरूवात नगरनियोजन कलम 16 ब अंतर्गत विजय सरदेसाई यांनी केली होती.
- कलम 39 अ ला ज्यावेळी विरोध झाला होता, त्यावेळी सरदेसाई त्यात सहभागी झाले नव्हते.
- आताही त्यांनी मंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेण्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला.
- लोकांना मूर्ख बनविण्याचा कोण प्रयत्न करीत आहे? ते आता स्पष्ट झाले आहे.
- ज्यांनी गोवा विक्रीस काढलेला आहे, त्यांना लोकांचे काहीही पडलेले नाही.
- स्वत:ची तिजोरी भरली की त्यांची तोंडे बंद होतात.
- लोक या सर्वांना ओळखून आहेत. त्यांना त्यांची योग्यवेळी जागा दाखवतील.
निरीक्षक विजयकुमार चोडणकरसह दोन्ही कॉन्स्टेबलांचीही बदली

नगर नियोजन कायद्यातील कलम 39 अ रद्द करण्यासाठी गेले पाच दिवस पाळे-शिरदोणवासियांचे जे आंदोलन सुरु आहे, त्या आंदोलनात उपोषणास बसलेले आरजीपीचे सांत आंद्रे मतदारसंघाचे आमदार विरेश बोरकर यांना नगर नियोजन खात्याच्या कार्यालयाच्या पायऱ्यांवरुन फरफटत नेणाऱ्या पोलिसांना घटनेच्या चौथ्या दिवशी सरकारने दणका दिला आहे. बोरकर यांना फरफटत नेणारे पणजी पोलिसस्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर, तसेच कॉन्स्टेबल शुभम भोसले व धनंजय परब यांच्यावर कारवाई करत सरकारने तिघांचीही बदली उत्तर गोवा जिल्हा रिझर्व लाईन फोर्स, पर्वरी येथे केली आहे.
आगशी पोलिसस्थानकाचे निरीक्षक हे पुढील आदेश येईपर्यंत पणजी पोलिसस्थानकाचा अतिरिक्त ताबा सांभाळणार आहेत, असे रात्री उशिरा काढलेल्या आदेशात म्हटले आहे. आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे आमदार बोरकर यांना फरफटत नेणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, ही मागणी आंदोलकांनी लावून धरली होती. मंगळवारी सायंकाळी उशिरा मुख्यमंत्र्यांनी आमदार बोरकर यांची आझाद मैदानावर भेट घेतली आणि त्यानंतर रात्री उशिरा या पोलिसांच्या बदल्यांचा आदेश जारी झाला.