For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘युनिटी मॉल’ रद्द होईपर्यंत आंदोलन चालूच रहाणार

12:37 PM Jan 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘युनिटी मॉल’ रद्द होईपर्यंत आंदोलन चालूच रहाणार
Advertisement

सरकारशी चर्चा फिसकटली : आज विधानसभेवर मोर्चा नेण्याचे जाहीर

Advertisement

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि चिंबलचे युनिटी मॉलविरोधी आंदोलक यांच्यातील काल बुधवारची चर्चा फिसकटली. आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना केली. परंतु त्यांनी ती फेटाळून लावली. तसेच आज गुरुवारी 15 जानेवारी सकाळी विधानसभेवर महामोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला. चिंबलमधून हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना सांगितले.

महामोर्चाचा सामना करण्यास पोलिस सज्ज

Advertisement

महामोर्चाचा सामना करण्यासाठी पोलिसांनी तयारी केली असून पणजीतच मांडवी पुलाकडे किंवा इतरत्र हा मोर्चा रोखण्याचे ठरविले आहे.पणजी शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून पोलिस-आंदोलकात चकमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुख्यमंत्र्यांकडील चर्चा फिसकटली 

चिंबल गावचे ग्रामस्थ आंदोलक युनिटी मॉलच्या प्रश्नावरून काल बुधवारी पर्वरी विधानसभा संकुलात येऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सभापती गणेश गावकर यांना भेटले. त्यांच्यात चर्चा झाली. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. आंदोलक मागणीवर ठाम राहिले. चिंबलमधून हा प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. गोमंतकीय जनतेने एकजूट दाखवून या मोर्चा सहभागी व्हावे, असे आवाहन चिंबलचे ग्रामस्थांनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चिंबल येथे युनिटी मॉलच्या विरोधात आंदोलन चालूच असून त्यांच्याकडे चर्चा करावी, अशी मागणी विरोधी आमदारांनी विधानसभेत लावून धरल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंदोलकांना विधानसभा संकुलात चर्चेसाठी पाचाररण केले होते.

त्यातून कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे आंदोलकांनी आता महामोर्चा काढण्याचा बेत आखला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की सरकारची आंदोलकांशी अजूनही बोलणी करण्याची तयारी आहे. त्यांनी अगोदर सरकारचे म्हणणे ऐकून घ्यावे. हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा, असे आपण आंदोलकांना सूचवले, परंतु आंदोलकांनी ऐकले नाही. चर्चेद्वारे प्रश्न सोडवता येईल, असेही ते  म्हणाले. आंदोलकांचे  म्हणणे आहे की युनिटी मॉल प्रकल्प गावातून हटवावा, तो आम्हाला नको. त्याचे चिंबल हे ठिकाण रद्द करावे. आज गुरुवार दि. 15 रोजी सकाळी 10 वाजता विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे, असे त्यांनी पत्रकारांसमोर जाहीर केले.

Advertisement
Tags :

.