For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लेखी आदेश मिळेपर्यंत आंदोलन सुरूच

01:04 PM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
लेखी आदेश मिळेपर्यंत आंदोलन सुरूच
Advertisement

चिंबलकरांचा पुन्हा इशारा : जमावबंदीमुळे जुने गोवेत केले आंदोलन

Advertisement

तिसवाडी : चिंबल गावकऱ्यांनी काल शुक्रवारी आयोजित केलेल्या महाआंदोलनाला संपूर्ण गोव्यातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. गोव्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी चिंबलकरांच्या आंदोलनाला साथ देत जुने गोवेतील महात्मा गांधी सर्कल परिसरात रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. युनिटी मॉल प्रकल्प स्थलांतराबाबत सरकारकडून लेखी आदेश जाहीर होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे. सकाळी चिंबल येथून मोठ्या संख्येने गावकरी पायी मोर्चा काढत जुन्या गोव्यात पोहोचले.

बासिलिका ऑफ बाँ जीझस चर्चपासून महात्मा गांधी सर्कल तसेच जुने गोवे येथे येणाऱ्या विविध रस्त्यांवर आंदोलनकर्ते बसले होते. त्यामुळे परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. यापूर्वी पणजी येथे आंदोलन करण्याचे नियोजन होते, मात्र सरकारने पणजीत भारतीय न्याय संहितेच्या कलम 163 अंतर्गत जमावबंदी लागू केल्यामुळे आंदोलनाचे ठिकाण बदलून जुने गोवे येथे आंदोलन करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व आंदोलनाचे प्रमुख नेते गोविंद शिरोडकर, अजय खोलकर आदींनी केले. यावेळी विरोधी पक्षनेते युरी अलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, कुंभारजुवे काँग्रेसचे नेते समिल वळवईकर यांच्यासह अनेक राजकीय नेते व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Advertisement

आदेश जारी व्हायला हवा

गोविंद शिरोडकर आणि अजय खोलकर यांनी स्पष्ट केले की, सरकारने प्रकल्प स्थलांतराचा दावा केला असला तरी अद्याप सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकृत लेखी आदेश जाहीर करण्यात आलेले नाहीत. जीटीडीसीकडून दिलेले आदेश आम्हाला मान्य नाहीत. याआधी सरकारने जे घडवले आहे, त्यानंतर सरकारवर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. तसेच संबंधित जमिनीबाबतच्या ‘प्रभाव क्षेत्र’ अधिसूचना पुन्हा जारी करण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे.

परिसर पूर्ववत करावा

आंदोलनातील महिलांनी सरकारवर गंभीर आरोप करताना सांगितले की, प्रकल्पाच्या नावाखाली वृक्षतोड, खोदकाम करण्यात आले असून जमिनीची नैसर्गिक रचना बदलण्यात आली आहे. याचा तलावावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सर्व पूर्ववत करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. आतापासून गोव्यातील कोणत्याही गावावर अन्याय झाला, तर चिंबलकर त्यांच्यासोबत उभे राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या गोव्यात सालाझारशाही

विरोधी पक्षनेते युरी अलेमाव यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, आज गोव्यात सालाझारशाही सुरू आहे. सरकारने कलम 163 लागू केल्यामुळे गावकऱ्यांना पणजीऐवजी जुन्या गोव्यात आंदोलन करावे लागले. आम्ही चिंबलकरांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.

Advertisement
Tags :

.