बेळगाव-बाची रस्ता दुरुस्तीसाठी सोमवारी उचगाव फाट्यावर आंदोलन
रास्तारोकोत सहभागी होण्याचे आवाहन
वार्ताहर/उचगाव
बेळगाव-बाची, कर्नाटक महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या महामार्गाची झालेली दुर्दशा पाहता हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. सदर रस्त्याची तातडीने दुऊस्ती करण्यात यावी. यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी उचगाव फाट्यावर येत्या सोमवार दि. 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तरी बेळगाव पश्चिम भागातील नागरिक आणि प्रवाशांनी या रास्ता रोको आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या भागातील सर्व ग्रामपंचायतींना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निवेदन देण्यात येत असून सर्व ग्रामपंचायतच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी या रास्तारोको आंदोलनामध्ये भाग घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे. बुधवारी या ग्रामपंचायतींना भेटी देण्यात आल्या. यामध्ये तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणयेकर, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी कुद्रेमणी, तुरमुरी, उचगाव, सुळगा या ग्रामपंचायतींना भेटी देऊन आंदोलनात भाग घेण्यासाठी निवेदने दिले. याप्रसंगी युवा नेते राजू किणेकर, दीपक आंबोळकर, महेंद्र जाधवसह ग्रामपंचायत सदस्य आणि समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. रस्त्यासाठी अनेकवेळा आंदोलन केले. त्याचबरोबर निवेदने देऊनही याकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे प्रवाशामध्ये नाराजी होती. याची दखल घेऊन आता तालुका म. ए. समिती पुढे सरसावली आहे.