सुळगा-उचगाव-तुरमुरी-बाची मार्गावर रास्ता रोको
खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण : खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून शासनाचा तीव्र निषेध : संतप्त प्रवाशांचा आक्रमक पवित्रा : शासनाच्या निषेधार्थ घोषणा : आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष
वार्ताहर/उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील बेळगाव-बाची या 15 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेऊनच रात्रंदिवस ये-जा करावी लागत आहे. अर्ज, विनंती, निवेदने देऊनसुद्धा कोणतीच ठोस भूमिका लोकप्रतिनिधी, बांधकाम खात्याकडून होत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी या मार्गावर सुळगा, बेळगुंदी, राकसकोप फाटा, कल्लेहोळ फाटा, उचगाव फाटा, तुरमुरी, बाची या सर्व ठिकाणी रस्त्यातील खड्ड्यांमधून वृक्षारोपण करून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला ‘आतातरी जागे व्हा आणि रस्ता दुऊस्तीच्या कामाला प्रारंभ करा, जनतेचा अंत पाहू नका,’ असे यावेळी संतप्त प्रवासी, नागरिकांनी ठासून सांगितले.
उचगाव फाटा
उचगाव फाट्यावर उचगाव ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा बाळकृष्ण तेरसे यांच्या नेतृत्वाखाली या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या उपस्थितीत रास्ता रोको करून वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, ग्रा. पं. माजी अध्यक्ष संभाजी कदम, ता. पं. माजी अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर, सदस्य एल. डी. चौगुले, माऊती खांडेकर, गजानन नाईक, यादो कांबळे, सदानंद पावशे, मनोहर होनगेकर, जावेद जमादार, शिवाजी चौगुले, सुरज सुतार, अंकुश पाटील, किसन लाळगे यांच्यासह अनेक नागरिक प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रास्ता रोको करून रस्त्यावरील खड्ड्यांमधून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संतप्त प्रवाशांनी शासनाचा धिक्कार केला. जवळपास गेली दोन वर्षे या रस्त्याकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या कर्नाटक शासनाने सातत्याने या रस्त्यावरील खड्ड्यांतून अनेकांची दुचाकी वाहने अडकून, पडून दुखापती झाल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनेक वाहने नादुऊस्त झाली आहेत. आणि तरीसुद्धा या गोष्टीकडे शासन गांभीर्याने पाहत नाही, अशा प्रतिकिया यावेळी अनेक प्रवाशांतून व्यक्त होत होत्या.
तुरमुरी-बाची
तुरमुरी-बाची याही ठिकाणी तुरमुरी आणि बाचीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन तुरमुरी आणि बाची परिसरातील या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतून वृक्षारोपण करण्यात आले. शासनाने तातडीने याची दखल घेऊन रस्त्यावरील खड्ड्यांतून दगड माती टाकून खड्डे बुजवावेत. आता सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांतून एक ते दीड फुटापर्यंत पाणी साचले आहे. रात्रीच्या अंधारातून प्रवास करताना वाहने खड्ड्यात अडकून मोठे अपघात होत आहेत, याची तातडीने दखल घ्यावी, असेही यावेळी नागरिकांनी सांगितले. यावेळी नागेश बेळगावकर, माऊती खांडेकर, आर. बी. गावडे, महेंद्र जाधव, ईराप्पा खांडेकर, शिवाजी खांडेकर, प्रताप राजूकर, राजू खांडेकर यासह या भागातील प्रवासी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुळगा (हिं.)रस्त्याची दुर्दशा
सुळगा (हिं.) परिसरातील हनुमान मंदिर ते हिंडलगा फॉरेस्ट चेकपोस्ट नाक्मयापर्यंत झालेल्या रस्त्याची दुर्दशा पाहता या भागातील प्रवासी, नागरिकांनी निषेध व्यक्त करत तातडीने या रस्त्याची दुऊस्ती करावी. सदर रस्त्यावरून प्रवास करतेवेळी खड्ड्यांमुळे विलंब होत आहे. तसेच या खड्ड्यांतून होणारे अपघात टाळावेत, यासाठी लोकप्रतिनिधींनी या रस्त्यासाठी निधी उभा करून येत्या दोन-चार दिवसात या रस्त्याची दुऊस्ती करावी, काँक्रिटीकरण करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी आर. एम. चौगुले तसेच विलास देवगेकर, सुभाष मरूचे, प्रवीण देसाई, सुधाकर करटे, किरण पाटील, परशराम पाटील, शिवाजी देवगेकर, संदीप पाटील यासह सुळगा भागातील प्रवासी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.