मागण्या मान्य न झाल्यास 15 ऑगस्टला आंदोलन
सफाई कर्मचारी हितरक्षण समितीचा इशारा : प्रादेशिक आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी
बेळगाव
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या स्वातंत्र्यदिनापूर्वी पूर्ण न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी कित्तूर राणी चन्नम्मा चौकात स्वत:वर कचरा टाकून घेत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सफाई कर्मचारी हितरक्षण समिती बेळगाव विभागाच्यावतीने देण्यात आला. याबाबतचे निवदेन प्रादेशिक आयुक्त जानकी एम. यांना देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा दक्षता व पर्यवेक्षण समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच संबंधित मंत्री, कर्नाटक सफाई कर्मचारी आयोग आणि इतर शासकीय यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा करूनही मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. डिसेंबर 2025 मध्ये सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करूनही कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचा आरोप संघटनेने केला.
विविध मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन
गेल्या 30 वर्षांपासून महापालिकेच्या गृहनिर्माण वसाहतीत वास्तव्यास असलेल्या 253 सेवानिवृत्त पालिका कर्मचाऱ्यांना घरांचे मालकी हक्क देणे, हाताने मैला साफ करणारे म्हणून ओळख झालेल्या 396 कुटुंबांना ओळखपत्रे वितरित करणे, गृहभाग्य योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी घरे उभारण्याचे काम तातडीने सुरू करणे, या 396 कुटुंबांतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात शासन आदेशानुसार वाढ करणे तसेच देवराज अरस गृहनिर्माण योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशा मागण्याही करण्यात आल्या.
आंदोलनाला प्रशासनच जबाबदार
2005 मध्येही याच मागण्यांसाठी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल 780 दिवस आंदोलन केले होते. याची पुनरावृत्ती होण्याअगोदर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. 15 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघेला, अध्यक्ष मुनिस्वामी भंडारी, विजय निर्गट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली कित्तूर राणी चन्नम्मा चौकात स्वत:वर कचरा ओतून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
780 दिवस आंदोलन...!
कित्तूर राणी चन्नम्मा चौकात स्वत:वर कचरा टाकून घेत आंदोलन करणार
हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करूनही ठोस निर्णय नसल्याचा आरोप
780 दिवस आंदोलनाची पुनरावृत्ती होण्याअगोदर प्रशासनाने निर्णय घ्यावा.