पाळे-शिरदोण ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश
भू- रुपांतरण प्रक्रिया निलंबित, सातव्या दिवशी आंदोलन मागे : आंदोलनात सहभागींचे विरेश बोरकर यांनी मानले आभार
पणजी : सांतआंद्रे मतदारसंघात 39 (अ) अंतर्गत करण्यात आलेली भू-रुपांतरण प्रक्रिया निलंबित करण्यात आली असल्याचे कायदेशीर पत्र जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी आंदोलकांना दिले आहे. या पत्रावर मुख्य नगरनियोजक वर्तिका डागूर यांची सही आहे. याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पाळे-शिरदोण ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे. आंदोलनाला विजय मिळाला खरा, मात्र निलंबन कधीही मागे घेण्याचा विचार होऊ शकतो, असे दिसून येते.
आतापर्यंत जे आम्ही काम पेले आहे त्याला समस्त गोमंतकीयांनी साथ दिली आहे. केवळ पाळे-शिरदोण भागातून हा लढा सुरु झाला होता, मात्र हा लढा सर्वांचाच आहे. आता आम्हाला केवळ आधार मिळाला आहे. या आधाराच्या सहकार्याने आम्हाला मुख्य हेतू साधायचा आहे तो म्हणजे 39 (अ) संपूर्ण गोव्यातून रद्द होणे नितांत गरजेचे आहे, असे विरेश बोरकर यांनी सांगितले. आमचा हा लढा संपलेला नसून काही क्षणापुरता थांबलेला आहे. नगर नियोजन कायदा 39 (अ) रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुऊच राहणार आहे, असे आमदार बोरकर यांनी सांगितले.
आंदोलनाला संपूर्ण गोव्यातून पाठिंबा
गेल्या सात दिवसांपासून पाळे-शिरदाण ग्रामस्थांनी नगर नियोजन कायदा 39 अंतर्गत सांतआंद्रे मतदारसंघातील करण्यात आलेले भू-रुपांतरण रद्द करण्यासाठी आमदार विरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या शुक्रवारपासून आंदोलन सुऊ केले होते. तर आमदार विरेश बोरकर आणि तुषार गावस यांनी शनिवारपासून उपोषण सुरु केले होते. जोपर्यंत 39 (अ) रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा निर्णय करून पाळे-शिरदोण ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केले होते. नंतर हे आंदोलन केवळ पाळे-शिरदोण ग्रामस्थांचे राहिले नसून ते संपूर्ण गोव्याचे झाले त्यांना विरोधी पक्ष तसेच गोव्यातील विविध भागातून सहकार्य मिळत गेले.
पत्र दुरुस्तीनंतर आंदोलन मागे
आंदोलनाला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे सरकारने धास्ती घेतली आणि एक पाऊल मागे घेण्याचा विचार केला. काल गुरुवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी कायदेशीर पत्र घेऊन आंदोलकांकडे आले होते. नंतर त्या पत्रातील काही चुका दुऊस्त करण्याची आंदोलकांनी मागणी केली. त्यानंतर पुन्हा दुऊस्त केलेले पत्र आंदोलकांना जिल्हाधिकाऱ्यांनी आणून दिले आणि आंदोलन मागे घेण्यात आले.