जिल्हाधिकारी कार्यालयावर २२ रोजी मोर्चा काढणार
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांना परवानगीसाठी निवेदन
बेळगाव : कन्नड भाषा व्यापक विकास अधिनियम 2022 लागू झाल्यानंतर बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषेच्या वापरावर निर्बंध आणले जात आहेत. यामुळे मराठी भाषिकांच्या घटनात्मक व भाषिक अल्पसंख्याक हक्कांच्या संरक्षणासाठी 22 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दि. 15 ते 19 जूनदरम्यान शहरातील विविध भागात जनजागृती फेरी आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांना देण्यात आले.
पूर्वी कर्नाटक सरकारच्या कार्यालयांमध्ये, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकृत फलक, सरकारी कागदपत्रे व नागरिकांशी संवादासाठी मराठी भाषेचा वापर केला जात होता. बेळगाव शहर व सीमाभागात 15 टक्क्मयांहून अधिक मराठी भाषिक आहेत. तसेच दैनंदिन व्यवहार आणि व्यावसायिक संवादासाठी मराठीचा वापर करतात. मात्र कन्नड भाषा व्यापक विकास अधिनियम 2022 लागू झाल्यानंतर अनेक शासकीय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फलकांवरून मराठी भाषेचा उल्लेख हटविण्यात आला. तसेच सरकारी कागदपत्रांमधील मराठी भाषेचा वापरही बंद करण्यात आला आहे.
काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांनी खासगी दुकाने व व्यावसायिक आस्थापनांवरील मराठीतील फलक हटविले आहेत. यामुळे मराठी भाषिक अल्पसंख्याकांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत असून बेळगाव व परिसरातील मराठी भाषिकांमध्ये चिंता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर 22 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार असून त्याआधी शहरातील विविध भागात जनजागृती बैठकींचे आयोजन केले आहे. दि. 15 ते 19 जूनदरम्यान शहरातील विविध भागात जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे.
15 जून रोजी शिवाजीनगर, आरटीओ सर्कल, चव्हाट गल्ली, जालगार गल्ली, खडक गल्ली, कंग्राळ गल्ली, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मेणसे गल्ली, भातकांडे गल्ली, बुऊड गल्ली, हंस टॉकिज रोड, बापट गल्ली, कडोलकर गल्ली, नरगुंदकर भावे चौक, माऊती गल्ली, अनसूरकर गल्ली, किर्लोस्कर रोड आणि हुतात्मा चौक परिसरात जनजागृती केली जाणार आहे.
दि. 16 जून रोजी टिळक चौक, कोनवाळ गल्ली, स्टेशन रोड, हेमू कलानी चौक, भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली, फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनिमंदिर ओव्हरब्रिज, महाद्वार रोड, शिवाजी गार्डन रोड, एसपीएम रोड, गुडस्शेड रोड, शास्त्रीनगर आणि शिवाजी गार्डन रोड शहापूर परिसराचा समावेश असणार आहे.
दि. 17 जून रोजी शिवाजी गार्डन, मठ गल्ली, बसवाण गल्ली, होसूर, महात्मा फुले रोड, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, कोरे गल्ली, आनंदवाडी, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली, नार्वेकर गल्ली, विठ्ठलदेव मंदिर रोड, तसेच खडेबाजार ते नाथ पै सर्कलपर्यंत फेरी काढण्यात येणार आहे.
दि. 18 जून रोजी भारतनगर, लक्ष्मी रोड, रयत गल्ली, बाजार गल्ली, वझे गल्ली, विष्णू गल्ली, मंगाई देवी मंदिर, यरमाळ रोड, संभाजीनगर, गाडेमार्ग, केशवनगर, येळ्ळूर रोड, आनंदनगर, कारभार गल्ली, नाझर कॅम्प, रामदेव गल्ली, सोनार गल्ली व वडगाव-शहापूर मुख्य रस्ता परिसरात जनजागृती करण्यात येणार आहे.
दि. 19 जून रोजी कुलकर्णी गल्ली, गणेशपेठ, कोरवी गल्ली, कलमेश्वर मंदिर रोड, मरगाई गल्ली, लक्ष्मी गल्ली, खन्नूकर गल्ली या भागात फेरी आयोजित करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 ते 9 यावेळेत ही जनजागृती करण्यात येणार आहे. प्रशासनाने या जनजागृतीसाठी आवश्यक परवानगी द्यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.