कारवारमध्ये भाजपच्यावतीने निषेध मोर्चा
शहर-ग्रामीणतर्फे जोरदार निदर्शने : जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याची गरज
कारवार : राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ मालमता म्हणून नोंद करण्याचे काँग्रेस सरकारचे षड्यंत्र आणि लँड जिहादच्या विरोधात कारवार शहर आणि ग्रामीणतर्फे सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जोरदार निदर्शने करण्यात आली. कारवार-अंकोलाच्या माजी आमदार व भाजपच्या राज्य उपाध्यक्ष रुपाली नाईक आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष एन. एस. हेगडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.यावेळी रुपाली नाईक म्हणाल्या, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने आजपर्यंत जनतेची लूट करून खजिना भरला आहे. तथापि आता हे सरकार मतपेटीवर डोळा ठेऊन वक्फ मालमतेचे प्रकरण पुढे आणले आहे.
वक्फ बोर्डची मालमता म्हणून गेल्या अनेक शतकापासून कसल्या जाणाऱ्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारच्या या धोरणाला कडाडून विरोध करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यासाठी जनतेमध्ये विशेष करून शेतकरी वर्गात जागृती निर्माण केली पाहिजे. या प्रकरणाचा बोलविता धनी मंत्री जमीर अहमद असून गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासाठी निघालेल्या अहमद यांनी राजीनामा दिला पाहिजे. आज जर आम्ही काँग्रेस सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडला नाही तर उद्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवर पाय ठेवता येणार नाही. उताऱ्यावर शेतकऱ्यांची नावे स्पष्टपणे नमूद केली पाहिजेत, अशी मागणी पुढे रुपाली नाईक यांनी केली.
हिंदूच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष
याप्रसंगी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष एन. एस. हेगडे म्हणाले, सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार लुटारू आहे. या सरकारकडून हिंदू समाजाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मुस्लीम समाजाच्या सेवेसाठी तत्पर असलेले हे सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करून हेगडे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज भाजप रस्त्यावर उतरले आहे. जोपर्यंत सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही, असे पुढे हेगडे यांनी सांगित ले. यावेळी राज्य सरकारच्या आणि जमीर अहमद यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी सुभाष गुणगी, नागेश कुर्डेकर, वकील संजय साळुंके, सुनील सोनी, किशन कांबळे, सुजाता बांदेकर, आशा पालनकर, देवीदास तळेकर, भाजपचे अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.