For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : स्वच्छ भारत व जल जीवन मिशन कर्मचाऱ्यांचा मानधन न मिळाल्याने जिल्हा परिषद समोर आंदोलन

05:55 PM Feb 04, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   स्वच्छ भारत व जल जीवन मिशन कर्मचाऱ्यांचा मानधन न मिळाल्याने जिल्हा परिषद समोर आंदोलन
Advertisement

                         चार महिन्यांचे मानधन न मिळाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष

Advertisement

सातारा : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा–२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांचे मानधन अद्याप अदा न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

या योजनांच्या अंमलबजावणीत ग्रामपंचायत स्तरावरील प्रत्यक्ष काम, क्षेत्रीय तपासणी, लाभार्थी समन्वय, ऑनलाईन नोंदी, अहवाल सादरीकरण तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील नियोजन व समन्वयाची जबाबदारी या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील मानधन अद्याप मिळाले नसतानाही कर्मचारी नियमितपणे काम करत आहेत.

Advertisement

मानधन रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक व मानसिक ताण वाढला असून याचा थेट परिणाम कामकाजाच्या कार्यक्षमतेवर होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. ही बाब जिल्हा परिषद स्तरावरील निर्णयांशी संबंधित नसून राज्यस्तरावरील निधी वितरण प्रक्रियेमुळे निर्माण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. मानधनाची तातडीने अदायगी न झाल्यास दि. ४ फेब्रुवारी २०२६ पासून काम बंद आंदोलन, तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सन २०२६–२७ चा वार्षिक कृती आराखडा (AIP) सादर न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनामुळे क्षेत्रीय तपासणी, अहवाल सादरीकरण, ऑनलाईन प्रणालीतील नोंदी व दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून, शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून मानधन अदा करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.