मंत्री हेब्बाळकर यांच्या समर्थकांकडून काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन
बॅनरवर फोटो न छापल्याने कार्यकर्ते संतप्त
बेळगाव : स्वाक्षरी संकलन मोहिमेच्या बॅनरवर महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार चन्नराज हट्टीहोळी यांचे फोटो डावलल्याने त्यांच्या समर्थकांनी सोमवारी जिल्हा काँग्रेसचा निषेध करत काँग्रेस भवनमध्ये आंदोलन केले. यावेळी बेळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्या विरोधातही संताप व्यक्त करत आरटीओ सर्कलनजीकच्या काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मतदान प्रक्रियेतील गैरप्रकाराविरुद्ध बेळगावमध्ये स्वाक्षरी संकलन मोहीम आयोजित करण्यात आली आहे. स्वाक्षरी संकलन मोहिमेदरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व आमदार चन्नराज हट्टीहोळी यांचे फोटो बॅनरवर छापण्यात आले नाहीत. त्यामुळे मंत्री हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी मोहिमेवर बहिष्कार टाकत निषेध केला. यावेळी समर्थकांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर लावण्यात आलेला बॅनरही फाडून टाकला.