बांगलादेशातील घटनेच्या निषेधार्थ बेळगावात आंदोलन
नागरी हितरक्षण समिती, ईस्कॉन, विविध हिंदू संघटनांचा पुढाकार
बेळगाव : बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेले हल्ले आणि ईस्कॉनच्या स्वामीजींना करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ नागरी हितरक्षण समिती बेळगाव, ईस्कॉन बेळगाव शाखा आणि विविध हिंदू संघटनांच्यावतीने बुधवारी धर्मवीर संभाजी चौकात मानवी साखळी करून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार होते. पण संभाजी चौकातच प्रांताधिकारी श्रवण नाईक यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन निवेदनाचा स्वीकार केला.
बुधवारी सकाळी धर्मवीर संभाजी चौकात ईस्कॉनच्या स्वामीजींच्या हस्ते संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे परिसर घोषणांनी दणाणून गेला. जमलेल्या ईस्कॉन मंदिराचे भक्त आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संभाजी महाराज चौकात मानवी साखळी करून रास्तारोको आंदोलन केले. सुमारे तासभर रास्तारोको आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. त्यामुळे पोलिसांनी पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळविली. आंदोलनकर्त्यांनी हातात ध्वज आणि फलक घेतले होते. या आंदोलनानंतर हिंदू जन आक्रोश मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चामध्ये ईस्कॉनच्या स्वामीजींचा, तसेच भक्त व नागरी हितरक्षण समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
धर्मवीर संभाजी चौकातून मोर्चा किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खडेबाजार, शनिवार खूट, काकतीवेस रोडमार्गे चन्नम्मा चौकात जाऊन त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार होते. मात्र, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना धर्मवीर संभाजी चौकातच बॅरिकेड्स लावून रोखून धरले. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी बोलावण्याची मागणी केली. मात्र, काहीवेळानंतर प्रांताधिकारी श्रवण नाईक यांनी आंदोलनस्थळी दाखल होऊन निवेदनाचा स्वीकार केला. यावेळी माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आमदार संजय पाटील, डॉ. बसवराज भागोजी, शिवाजी शहापूरकर, रोहन जुवळी, विजय जाधव, रोहित हुमणाबादीमठ, श्रीकांत कदम, प्रमोदकुमार, श्रीकांत कांबळे, निळकंठ स्वामीजी, नागेंद्रप्रभू, विजय सिद्धेश्वर, कृष्ण भट, राजेंद्र जैन, शंकरानंद स्वामीजी, विजय सिद्धेश्वर स्वामीजी यांच्यासह विविध हिंदू संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.