शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी न लावल्यास आंदोलन
नेगील योगी शेतकरी सेवा संघातर्फे इशारा
बेळगाव : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष देऊन त्याचे निराकरण करावे. राज्य सरकार शेतकरी व गोरगरिबांकडे दुर्लक्ष करत आहे ही बाब निंदनीय आहे. जगाचा पोशिंदा मानल्या जाणाऱ्यांना विसर पडला असून राज्यात बळीराजाच्या हितासाठी सरकारने कार्यरत रहावे. शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नेगील योगी शेतकरी सेवा संघाच्यावतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ज्या कंपन्यांनी पीकविमा काढला आहे, त्यांनी तात्काळ नुकसानभरपाई द्यावी. त्याचबरोबर वन्यप्राण्यांमुळेही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते, यासाठी सरकारने भरपाई द्यावी. काहीवेळा वन्यप्राण्यांमुळे व सर्पदंशाने शेतकऱ्यांना आपल्या प्राणाला मुकावे लागते. त्यांना सरकारने 25 लाख रुपयांचा मदतनिधी द्यावा. कृषी खात्याकडून निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे पुरविण्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून 12 हजार प्रति एकर भरपाई देण्यात यावी. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी कायदा करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. यावेळी वीरभद्र तुरमुरी, नागेंद्र दोडन्यायकर, नागगौडा पाटील, सुरेश नागरून, परशुराम आरेश यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.