For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टरबूज, काकडी बुट्या न घेतल्याने आंदोलन

10:33 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
टरबूज  काकडी बुट्या न घेतल्याने आंदोलन
Advertisement

येळ्ळूर येथे बस चालक-वाहकाला विचारला जाब : पुन्हा आंदोलन करण्याचा महिलांचा इशारा

Advertisement

येळ्ळूर : येळ्ळूर येथील शेतकरी महिला टरबूज घेऊन शहराकडे विक्रीसाठी येत असतात. बसच्या माध्यमातून त्या प्रवास करत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून बस चालक त्या महिलांना बसमध्ये घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी येळ्ळूर येथे बससमोर टरबूजच्या बुट्या ठेऊन आंदोलन केले. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. चालक-वाहकांना नागरिकांनी यावेळी धारेवर धरले. पावसाने दडी मारल्याने कडधान्य पिकांची पेरणी करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये टरबूज, काकडी यासह इतर पिकांचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केला. आलेले उत्पादन वडगाव, शहापूर, बेळगाव, टिळकवाडी परिसरात दिवसभर उन्हामध्ये महिला बसून विक्री करत असतात. त्यामुळे महिला बसमधून टरबूजांची बुटी घेऊन दरवर्षी शहराकडे येत असतात. मात्र यावर्षी बस चालकांनी बुट्या घेण्यास नकार देऊन महिलांना उद्धट उत्तरे देत आहेत. त्यामुळे संतप्त महिलांनी हे आंदोलन केले.

...तर केएसआरटीसी कार्यालयासमोरच आंदोलन

Advertisement

येळ्ळूर परमेश्वरनगर, सुळगा, यरमाळ, देसूर या गावांना बसेस सोडण्यात आल्या आहेत. येळ्ळूर वेशीतील बस थांब्यावर थांबलेल्या महिलांना बुट्या असतील तर घेण्यास नकार दिला जात आहे. तुम्ही आमच्याकडून बसचे तिकीट घ्या. बुटीसाठीही जी रक्कम घ्यायची आहे ती घ्या पण आम्हाला बसमध्ये प्रवेश द्या, अशी विनवणी महिलांनी केली. अनेकवेळा बस वाहक आणि चालकालाही विनवणी करूनही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे. यापुढेही बसचालकांनी जर बुट्या घेतल्या नाहीत तर केएसआरटीसीच्या कार्यालयासमोरच आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

Advertisement
Tags :

.