For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हा पंचायतला टाळे ठोकून आंदोलन

11:51 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्हा पंचायतला टाळे ठोकून आंदोलन
Advertisement

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी : रामदुर्ग तालुक्यात 28 कोटींचा भ्रष्टाचार

Advertisement

बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील ग्राम पंचायतींमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. लेखापरीक्षणातून ही बाब उघड झाली असली तरी अधिकाऱ्यांवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. याच्या निषेधार्थ ओबळापूर गावातील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी संघटनेकडून जिल्हा पंचायतीला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले. रामदुर्ग तालुक्यातील मुद्देनूर, ओबळापूर या ग्राम पंचायतींमध्ये 2023 मध्ये 28 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवरून भ्रष्टाचार झाल्याचे दिसून आले आहे. यावरून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करण्यात यावी, यासाठी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ओंबुड्समन न्यायालयामध्येही गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाले आहे. ग्रामीण विकास आयुक्तालय बेंगळूर यांच्याकडून जिल्हा पंचायतीला पत्र पाठवून संबंधितांवर कारवाई करून हडपलेली रक्कम वसूल करण्यासाठी सूचना केली आहे. तसेच भ्रष्टाचार केलेल्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सूचना केली आहे. व्याजासह रक्कम वसूल करण्याची सूचना करूनही अधिकाऱ्यांकडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

कर्मचारी अडकले अडचणीत

Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ओबळापूर ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून जिल्हा पंचायतीला टाळे ठोकून आंदोलन पेले. तर जिल्हा पंचायतीच्या आवारात प्रवेश करण्यासाठी असणारे मुख्य प्रवेशद्वारही बंद करून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडकून पडावे लागले होते. जि. पं. कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनाही ताटकळतच बाहेर थांबावे लागले होते. शेतकरी संघटनेने घेतलेल्या पावित्र्यामुळे अधिकाऱ्यांना मागील द्वारातून बाहेर पडावे लागले.

Advertisement
Tags :

.