दिल्लीतील धरणे आंदोलनासाठी अ. भा. प्रा. शिक्षक संघाचे प्रतिनिधी रवाना
टीईटी व जुनी पेन्शन प्रश्नी दिल्ली जंतर-मंतरवर आंदोलन
ओटवणे| प्रतिनिधी
टीईटी व जुनी पेन्शन प्रश्नी सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे जंतरमंतरवर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन असुन यासाठी देशभरातून शिक्षक सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे प्रतिनिधी दिल्ली येथे रवाना झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर २०२५ रोजी टिईटी अनिवार्यते संबधी दिलेला निर्णय समस्त शिक्षकांना व्यथित करणारा तसेच त्यांनी आतापर्यंत केलेल्या अनुभव सिध्द कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा व शिक्षक संवर्गाचे अस्तित्व मिटवणारा आहे. या निर्णयाच्या विरोधात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने २५ सप्टेंबर रोजी शिक्षक संघटनेच्यावतीने पहिली पुनर्विचार याचिका दाखल केली असून वेगवेगळ्या पाच याचिका संघटना दाखल करत असुन या संबधी कायदे तज्ञांचा सल्लाही संघटना घेत आहे. याबाबत विविध राज्यांनीही याचिका दाखल केल्या असून देशभरातील समस्त शिक्षक वर्ग न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.न्यायालयीन लढाई बरोबरच आंदोलनाचा मार्ग अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने अवलंबला आहे. कारण ही लढाई दिसते तेवढी सोपी नाही. मा.पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री तसेच प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री यांना संघटनेच्या वतीने शासनाने हस्तक्षेप करावा यासाठी प्रत्येक राज्यातून एकाच वेळी निवेदन दिले.लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेवून येणाऱ्या अधिवेशनात या प्रश्नी आवाज उठवावा अशी विनंती करण्यात येत आहे. त्याचबरोबर देशभरातील लाखो शिक्षकांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे.त्यामुळे आता २४ नोव्हेंबर रोजी देशभरातील शिक्षक प्रातिनिधिक लक्षवेधी धरणे आंदोलन देशाची राजधानी दिल्ली येथील ऐतिहासिक जंतरमंतर वर करणार आहेत. या आंदोलनाचा आपण भाग होऊन या आंदोलनात सहभाग नोंदवा असे आवाहन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.