गोवा रहिवासी प्रमाणपत्राची अट शिथिल केल्याबद्दल कुलगुरुंना घेराव
पदभरतीत गोमंतकीय युवकांवर अन्याय करण्याचा डाव : गोवा फॉरवर्डचे नेते प्रशांत नाईक यांचा आरोप
पणजी : गोवा फॉरवर्ड पार्टीचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी काल शुक्रवारी आपल्या पक्षाच्या अन्य नेत्यांसह गोवा विद्यापीठाच्या नोकर भरती संदर्भात 15 वर्षांच्या गोव्यातील रहिवासी प्रमाणपत्राची अट शिथिल करणारी जाहिरात जारी केल्याबद्दल कुलगुऊ हरीलाल मेनन यांना घेराव घालून जाब विचारला. उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दीपक कलंगुटकर, सरचिटणीस संतोषकुमार सावंत, पर्यावरण विभागाचे संयोजक विकास भगत आणि कार्यकारी सदस्य कादर शाह, फ्रेडी त्रावासो यांच्यासह विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांचाही त्यात समावेश होता.
गोवा विद्यापीठाने दोन जागा भऊन काढण्यासाठी 23 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात दिली होती. त्यातील एक जागा इतर मागासवर्गीय तर दुसरी जागा अनुसूचित जातीच्या बांधवांसाठी होती. या संदर्भात उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या, पण निवड केली नव्हती. 2 ऑगस्ट 2024 रोजी पुन्हा जाहिरात करून इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जातीसाठी राखीव असलेली पदे रद्द करण्यात आली. एवढेच नव्हे तर यासाठी जी 15 वर्षांच्या राज्यातील अधिवासाची अट होती तीही रद्द करण्यात आली. या गोष्टीला गोवा फॉरवर्डने आक्षेप घेतला आहे.
या पदांसाठी पात्र गोमंतकीय उमेदवार असताना कुलगुरू बाहेरील लोकांना या जागेवर आणण्याचा विचार का करत आहेत? असा सवाल नाईक यांनी केला. या पदासाठी पात्र गोमंतकीय उमेदवारांनी मुलाखतीही दिल्या होत्या. या गोमंतकीय उमेदवारांना हाकलून लावण्यासाठीच कुऊगुऊनी या मुलाखती घेतल्या होत्या का असा सवाल प्रशांत नाईक त्यांनी केला आहे. गोवा विद्यापीठाच्या घसरलेल्या दर्जाबद्दल सवाल करताना नाईक यांनी, जर विद्यापीठ बाहेऊन पात्र उमेदवारांना गोवा विद्यापीठात शिकवायला आणत असेल तर विद्यापीठाचा दर्जा सतत का घसरतो? असा प्रश्न करून गोव्यातील विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यापीठ पैसा का खर्च करीत नाही? असा सवाल केला. गोव्याबाहेऊन येणाऱ्या उमेदवारांना गोव्यातील विद्यार्थ्यांशी कुठलेही देणेघेणे नसते त्यामुळे हे शिक्षक फक्त आपला पगार घेण्यासाठीच काम करतात. ते गोव्यातील विद्यार्थ्यांशी समरस होत नाहीत. यामुळेच ही परिस्थिती उद्भवलेली आहे, असे सांगून गोवा फॉरवर्ड हा अन्याय सहन करणार नाही असे त्यांनी सांगितले.
मुलाखती स्थगित करण्याचे आश्वासन
गोवा फॉरवर्डच्या आणि विद्यार्थ्यांच्या मागणीवऊन कुलगुऊ हरीलाल मेनन यांनी या पदासाठीच्या मुलाखती थांबविण्याचे आश्र्वासन दिले आहे. या विषयावर पुढील चर्चा करण्यासाठी गोवा फॉरवर्डच्या चार सदस्यांचे शिष्टमंडळ कुलपतींची भेट घेणार आहे. गोव्यातील अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय घटकातील उमेदवारांना न्याय मिळवून देईपर्यंत, गोवा फॉरवर्ड स्वस्थ रहाणार नाही, असे नाईक यांनी सांगितले.