राजहंसगडात रेशन दुकानाविरोधात एल्गार
संघाच्या पदाधिकाऱ्यांवर कमिशन हडपल्याचा गंभीर आरोप : ई-केवायसीसाठी 50 रुपये घेतल्या धक्कादायक प्रकार : न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच
वार्ताहर/धामणे
राजहंसगड येथे रेशन दुकानाविरोधात ग्रामस्थांनी एल्गार उगारला आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांवर कमिशन हडपल्याचा गंभीर आरोप करत राजहंसगड येथील संघामार्फत चालवल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानाच्या कारभाराविरोधात गुरुवारी ग्रामस्थांनी एकत्र येत जोरदार एल्गार पुकारला. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सदर रेशन दुकान हे संघामार्फत चालवले जाते. मात्र प्रत्यक्षात अध्यक्ष आणि एका बोगस सेक्रेटरीने कोणालाही विश्वासात न घेता सर्व व्यवहार करून शासनाकडून मिळणारे कमिशन हडप केले आहे. तसेच संघांचे नूतणीकरण नसताना बोगस सेक्रेटरी तयार करण्यात आला आहे.
तसेच दुकानात सर्वसामान्य लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळत नसल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. ‘राजहंसगड ग्रामाभीवृद्धी हागू विविध उद्देश संघ“ या नावाने राजहंसगड येथे रेशन वाटप करण्यात येते. परंतु मागील तीन वर्षांपासून हा संघाचे नूतणीकरण करण्यात आले नाही. गावात याबद्दल वादविवाद असल्याकारणाने नूतणीकरण झाले नाही. असे असताना भाऊराव पवार या अध्यक्षाने कोणाला विश्वासात न घेता बोगस सेक्रेटरी तयार केला आणि येणारे सर्व कमिशन हडप केले आहे, असा आरोप इतर सदस्यांनी केला आहे. याबद्दल सदस्यांना याची माहिती मिळताच सर्वांनी याची बँकेत चौकशी केली असता एक लाख तीन हजार रुपये काढल्याचे निदर्शनास आढळले.
दोषींची, हकालपट्टी करण्याची मागणी
याचबरोबर ई-केवायसी करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांकडून 50 रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही सेवा शासनामार्फत मोफत असताना नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या सर्व प्रकाराची आज अधिकाऱ्यांनी झडती घेतली असता अनेक अनियमितता आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित दुकानाची तातडीने चौकशी करून दोषी अध्यक्ष आणि बोगस सेक्रेटरीची हकालपट्टी करावी आणि परवाना रद्द करून संघाचे नूतणीकरण करून दुकान चालवण्यास द्यावे व ग्रामस्थांची गैरसोय थांबवावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जाब विचारण्यास गेले असता सेक्रेटरीचे पलायन
यावेळी गावकऱ्यांनी अध्यक्ष व बोगस सेक्रेटरीच्या घरी जाऊन जाब विचारला मात्र भाऊराव पवार याने तिथून पलायन केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला, ग्रामस्थ उपस्थित होते. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. काही काळ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी वेठीस धरले.