शिवाजी विद्यापीठाच्या नामांतर विरोधात आंदोलन
विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलनः राजकीय पक्षासह विविध संघटना निदर्शनात सहभागी
कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ नामांतराच्या विरोधात आज कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले. विद्यापीठाच नामांतर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं, अशी हिंदुत्ववादी संघटनाची मागणी आहे. मात्र याला कोल्हापुरातील शिवप्रेमी संघटनाकडून विरोध होत आहे. आज विविध राजकीय पक्ष, संघटनानी आंदोलन करून पूर्वीचच नाव राहावं, अशी मागणी केली आहे. विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. नामांतर होऊ नये, या मागणीचे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आपलं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ अशी जोरदार घोषणाबाजी केली.
"महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री 'यशवंतराव चव्हाण' यांनी त्यावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या चार विभागातील लोकांची सोय व्हावी. शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचावी, म्हणून 'शिवाजी विद्यापीठा'ची स्थापना केली. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेवेळी महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला होता. यावेळी पहिले आमदार डी. डी. बराले यांनी 'श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असे नाव असावे अशी, सूचना मांडलेली होती. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले, ज्याप्रमाणे जेएनयू असा शॉर्टफॉर्म झाला आहे. त्याप्रमाणे या नावाचाही होईल आणि लोकांच्या तोंडात शिवाजी महाराजांचे नाव राहणार नाही. म्हणून शिवाजी विद्यापीठ असे नाव रहावं, अशी समजूत काढली. त्यानंतर सर्व सदस्यांनी एक मुखी निर्णय घेऊन शिवाजी विद्यापीठ हे नाव ठरविण्यात आले. गेले काही दिवस विद्यापीठाचे नाव बदलण्यासाठी नामविस्तार चळवळ उभारली आहे. तरी मी कुलगुरुंकरवी राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना सांगू इच्छितो, की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नावाचे आणखी एक विद्यापीठ महाराष्ट्रात आहे. शिवाजी विद्यापीठ ही आमची कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरची एक अस्मिता आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक, कर्मचारी, राजकिय पक्षाचे नेते, शिवप्रेमी आम्ही सर्वांनी मिळून सरकार इशारा देत आहोत, की आम्ही कोणत्याही प्रकारे विद्यापीठाचा नामविस्तार होऊ देणार नाही. हा आमच्या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे", अशी प्रतिक्रीया शिवसेना (उबाठा) चे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी यावेळी दिली.