कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ गोमेकॉत धरणे
पणजी : कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाचा निषेध म्हणून बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजच्या (गोमेकॉ) प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी काल शुक्रवारी गोमेकॉच्यासमोर घरणे धरून निषेध व्यक्त केला. त्या महिला डॉक्टरला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी महिला डॉक्टर आणि महिला कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत काही मागण्या डीनसमोर मांडल्या आहेत.
गोमेकॉतील डॉक्टर संपावर गेल्याने कामकाजात काही अडथळा आला काय, असे डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांना विचारले असता ते म्हणाले की कोलकाता यथे घडलेली घटना निषेधार्थ आहेच. परंतु डॉक्टर या नात्याने येणाऱ्या ऊग्णाला सेवा देणे हे आमचे कर्तव्य आहे. गोमेकॉतील डॉक्टर जरी संपावर गेले असले तरी गोमेकॉतील आपत्कालीन सेवा सुऊ ठेवण्यात आली आहे. ओपीडी बंद ठेवण्यात आलेली नाही. आपत्कालीन सेवा सुऊ ठेवण्याचे ठरविले आहे. तसे संपावर असलेल्या डॉक्टरांनीही ते मान्य केले आहे, असेही बांदेकर यांनी सांगितले.
डॉक्टरांनी गोमेकॉतील सुरक्षेसंदर्भात काही मागण्या मांडलेल्या आहेत. त्याबाबत नक्कीच विचार केला जाईल. तसे पाहिल्यास गोमेकॉचा कॅम्पस हा सुरक्षित आहे. येथे सुरक्षा रक्षकासह गोवा पोलीससही असतात. गोमेकॉच्या परिसरात 300 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरा असून सर्व कॅमेरा चालतात. त्यामुळे गोमेकॉचा कॅम्पस सुरक्षित आहे. तरीसुध्दा डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांचा नक्कीच विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.