मॅग्नेट स्कूल विरोधात 10 रोजी आंदोलन
एआयडीएसओकडून जिल्ह्यात जागृती : बेंगळूर येथे जाहीर सभा
बेळगाव : केपीएस मॅग्नेट योजनेच्या नावाखाली 40 हजार सरकारी शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. या विरोधात शुक्रवार दि. 10 रोजी बेंगळूर येथील फ्रिडम पार्क येथे राज्यस्तरीय भव्य जाहीरसभा घेतली जाणार आहे. या सभेच्या जागृतीसाठी बेळगावमध्ये प्रचार केला जात आहे. होन्निहाळ, कुट्टलवाडी, बाळगमट्टी, मल्लाहोळी, हालभावी यासह इतर गावामध्ये एआयडीएसओच्या नेतृत्त्वाखाली जागृती करण्यात आली.
मागील चार महिन्यांपासून केपीएस मॅग्नेट योजनेविरोधात एआयडीएसओचे आंदोलन सुरू ::आहे. गावागावात पालक व ग्रामस्थांच्या नेतृत्त्वाखाली सरकारी शाळा वाचविण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत सरकारी शाळा बंद होऊ देणार नाही, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. लहान शाळा मोठ्या शाळांमध्ये विलिन करून सरकारी शिक्षण संपविण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असल्याचा आरोप करण्यात आला.
कोणत्या शाळा विलीन करायच्या या संदर्भात शिक्षण विभागाकडून तयारी सुरू आहे. त्या शाळांच्या मुख्याध्यापकांना तसे तोंडी आदेश देण्यात आले आहेत. 8 अथवा 9 एप्रिल रोजी होणाऱ्या पालक सभामध्ये पुढील शैक्षणिक वर्षात मुलांना केपीएस शाळांमध्ये पाठविण्यासाठी शाळांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. 1 एप्रिल रोजी जिल्हा शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीत केपीएस शाळांबाबत चर्चा करण्यात आली आहे.
केपीएस मॅग्नेट योजना ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी असल्याने 10 एप्रिल रोजी बेंगळूर येथे होणाऱ्या सभेला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी कर्नाटकातील अनेक नामवंत उपस्थित राहणार असून बेळगाव जिल्ह्dयातून या सभेला मोठा प्रतिसाद द्यावा, असे आवाहन एआयडीएसओकडून करण्यात आले आहे.