For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनाथ-वंचित मुलांचे प्राधान्याने संरक्षण करा

10:47 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनाथ वंचित मुलांचे प्राधान्याने संरक्षण करा
Advertisement

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सूचना : भित्तीपत्रकाचे अनावरण

Advertisement

बेळगाव : बालकामगार, कचरा वेचणारी मुले, भिक्षाटन करणारी मुले, बालविवाह झालेले, घरातून बेपत्ता झालेले, ज्यांचे आई-वडील कारागृहात आहेत अशी मुले, प्रेमप्रकरणातील मुले आदी 18 वर्षांखालील अनाथ, एकल पालक मुले, कौटुंबिक समस्यांनी त्रस्त मुलांच्या संरक्षणाची कामाची गती वाढविण्याची सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी जिल्हा बालकल्याण व संरक्षण समितीची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, बेळगाव शहर व जिल्ह्यासाठी दोन स्वतंत्र मुलांसाठीचे विशेष पोलीस घटक कार्यरत आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात अशी मुले आढळून आल्यास त्वरित त्यांचे संरक्षण करावे, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

लहान मुलांचे संरक्षण केल्यानंतर आवश्यक तपास अहवाल सादर करावा. बालविवाह, बालकामगार, शिक्षणापासून वंचित मुलांना पुढील संगोपनासाठी बालकल्याण समितीसमोर त्यांना हजर करावे. एफआयआर दाखल करून घेऊन प्रकरणांची चौकशी करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी बोलताना जिल्हा बाल संरक्षण विभागाचे महांतेश बजंत्री म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून सर्व शाळा-कॉलेज, ग्राम पंचायती, महिला व बाल संरक्षण समितीच्या बैठका घेण्यात येत आहेत. बालविवाह, बालकामगार कायदा, बालसंरक्षण आदींविषयी जागृती कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. चाईल्ड हेल्पलाईन 1098 चाही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव व वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पी. मुरलीमोहन रे•ाr आदींच्या हस्ते महिला, मुलांच्या संरक्षणासंबंधी तीस कलमी माहितीचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. यावेळी एसीपी सदाशिव कट्टीमनी, जि. पं. चे मुख्य योजना निर्देशक गंगाधर, महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक एम. बसवराज, क्रीडा खात्याचे उपसंचालक बी. श्रीनिवास यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.