Kolhapur News: घाटकरवाडी येथे 'हत्ती कॅम्प' उभारण्याचा प्रस्ताव
कोल्हापूर वनविभागाकडून पाच कोटींचा प्रस्ताव
कोल्हापूर: आजरा, चंदगड या परिसरात हाती मानव संघर्ष मोठ्या प्रभाणात वाढत चालला आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी तसेच हत्तीचे पुनर्वसन संरक्षण, शास्त्रीय पध्दतीने व्यवस्थापण करण्यासाठी अत्याधुनिक 'एलिफंट कैम्प उभारण्याचा अंदाजे पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव वगविभागाने राज्य शासनाकडे पाठवला आहे.
हा कॅम्प आजरा पर्वतरांगांतील घाटकरवाडी धरणाजवळ उभारण्याची प्राथमिक योजना असून, या ठिकाणाची निवड भौगोलिक रचना, वनसंपदा आणि उपलब्ध पाणीसाठा यामुळे करण्यात आल्याची माहिती वनविभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
याच परिसराच्या एका बाजूने राज्यमार्ग क्रमांक १३४ जात असलेल्या कॅम्पला आवश्यक असलेल्या साहित्याची वाहतूक, उपचारासाठी लागणाऱ्या संसाधनांची उपलब्धता आणि नियंत्रण कक्षाशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे. शिवाय, पर्यटनक्षेत्र म्हणूनही या भागाला मोठी मागणी असल्याने विकासास हातभार लागण्याची शक्यता आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळताच कॅम्पसाठी आवश्यक जागा निश्चित करणे, तांत्रिक नकाशे तयार करणे, कामाचे टेंडर काढणे आणि टप्याटप्याने कॅम्पचे बांधकाम सुरु करणे अशी प्रक्रिया राबवली जाणार आहे. विभागाने आधीच प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले असून पाण्याची उपलब्धता, गवताळ क्षेत्र, सुरक्षित अंतर आणि पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे.
पर्यटन आणि स्थानिक रोजगाराला मिळणार चालना
कॅम्पमुळे आजरा परिसरात जगंल सफारी, हत्ती निरीक्षण केंद्र, पर्यावरण पर्यटन यांना गती मिळेल. यामुळे स्थानिक युवकांसाठी मार्गदर्शक, चालक, सेवा सुविधा इत्यादी स्वरूपात रोजगार निर्मिती होणार आहे. घाटकरवाडी धरण परिसराचे भू आकर्षण यामुळे पर्यावरण पर्यटनासाठी हे ठिकाण अधिक सक्षम होईल.
एलिफंट कॅम्प ठरणार महत्वाचे केंद्र
कोल्हापूर, सिंधुदुर्ग परिसरात टस्करांची संख्या वाढली असून मानवी- वन्यजीव संघर्षाच्या घटनाही वाढल्या आहेत. शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान, गावांमध्ये घुसखोरी, नागरिकांमध्ये निर्माण होणारी दहशत यामुळे वनविभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशावेळी हत्तींना मार्गदर्शन, वैद्यकीय उपचार, रेस्क्यू, मॉनिटरिंग आणि तांत्रिक पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी 'एलिफंट कॅम्प' महत्वाचे केंद ठरणार आहे.
या कॅम्पमध्ये हत्तींसाठी निवासस्थान, रसद व्यवस्थापन, पशुवैद्यकिय सुविधा, निगराणी केंद्र, प्रशिक्षण विभाग आणि विश्श्रांती शिबिरे अशी बहुविध संरचना विकसित करण्यात येणार आहे. हत्तींच्या हालचालीचे उपग्रह तंत्रज्ञानावर आधारित मॉनिटरिंग, ड्रोन सर्बिलन्स आणि तैनात पथके यांमुळे संघर्षाच्या घटनांवर नियंत्रण मिळू शकणार आहे.
आजरा, चंदगड भागात हत्तींची हालचाल सतत वाढत आहे. या पार्श्वमूभीवर हत्तींच्या देखभालीसाठी आणि संघर्ष कमी करण्यासाठी आधुनिक एलिफंट कॅम्प'ची गरज होती. घाटकरवाडी हा कॅम्प उभारण्यासाठी अंत्यत योग्य परिसर आहे. प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून मंजुरी मिळाल्यानंतर कान तातडीने सुरु करण्यात येईल. या कॅम्पमुळे वनविभागाचे काम अधिक प्रभावी होईल आणि नागरिकांनाही दिलासा मिळेल.
- धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक