For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कलेची समृद्धी, शिक्षणातील प्रगती हीच अंत्रुज महालाची खरी श्रीमंती

12:59 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
कलेची समृद्धी  शिक्षणातील प्रगती हीच अंत्रुज महालाची खरी श्रीमंती
Advertisement

परिसंवादातून उमटला वक्त्यांचा सूर

Advertisement

फोंडा : अंत्रुज महाल हे विविध कलांचे माहेरघर असून साहित्य, संगीत व अन्य कला क्षेत्रात उच्च प्रतिभेचे लेखक कलावंत या भूमित जन्मले. शिक्षण क्षेत्रातही चौफेर प्रगती साधलेल्या या तालुक्यातील हा समृद्ध वारसा नवीन पिढीने तेवढ्याच सामर्थ्यांने पुढे नेला पाहिजे, असे मत डॉ. विद्या प्रभूदेसाई यांनी ‘कला साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात अंत्रुज महाल’ या विषयावरील परिसंवादात मंडले. बिल्वदलच्या अंत्रुज महाल मराठी साहित्य संमेलनात उद्घाटन सोहळ्यानंतर झालेल्या या सत्राचे अध्यक्षपद डॉ. विद्या प्रभूदेसाई यांनी भूषविले.  परिसंवादात नितिन कोलवेकर यांनी नाटक, रमेश वंसकर यांनी संत परंपरा, दुर्गाकुमार नावती यांनी संगीत, मच्छिंद्र च्यारी यांनी मंदिर परंपरा, का. बा. मराठे यांनी प्राथमिक शिक्षण व डॉ. बिभीषण सातपुते यांनी उच्चशिक्षण या विषयावर विचार मांडले. श्री. मराठे यांनी आपला विषय मांडताना, अंत्रुज महालाने शिक्षणक्षेत्रात चौफेर प्रगती साधल्याचे सांगितले. मात्र ज्या पद्धतीने शिक्षण संस्था उभ्या राहिल्या त्या पद्धतीने प्राथमिक स्थरावर बालशिक्षणाच्या सिद्धांतानुसार शिक्षण मिळत नाही. तसेच झाल्यास आज निर्माण झालेले सामाजिक व सांस्कृतिक प्रश्न सुटतील असे मत त्यांनी मांडले. रमेश वंसकर यांनी गोमंतकीय भजनी सप्ताहाचे प्रणेते संत जगन्नाथबुवा बोरीकर व साईभक्त सगुण मेरु नाईक यांच्या कार्याचा आढावा घेतला. बोरीकर बुवांनी भजनी सप्ताहाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे महान कार्य केले. तर सगुण मेरु नाईक यांनी साईबाबांच्या हयातीत शिर्डीत राहून भक्तगणांना हयातभर पाणी देण्याचे पुण्यकार्य केले. त्यांच्याच पुण्याईतून पश्चिम शिर्डी म्हणून ओळखले जाणारे बोरीचे साईबाबाचे मंदिर उभे राहिले.

नितिन कोलवेकर यांनी कलेचे माहेरघर असलेल्या अंत्रुज महालात नाटक हा विशेष जिव्हाळ्याचा विषय असल्याचा सांगून मुक्तीपूर्व काळापासून सुरु झालेली नाट्यापरंपरा व नाट्याकर्मींच्या कार्याचा आढावा घेतला. येथील उत्सवातून उभ्या राहिलेल्या हौशी नाट्यापरंपरेला ओहोटी लागल्याची खंत व्यक्तही व्यक्त केली. हौशी नाटकाशी गावातील छोट्यामोठ्या कलाकारांची भावनिक जवळीक असल्याने ही परंपरा टिकवून ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दुर्गाकुमार नावती यांनी शास्त्रीय संगीताबरोबरच लोकसंगीत, भजनी परंपरा, नाट्यासंगीत यांचा आढावा घेतला. गोमंतक मराठा समाजाने देवाची सेवा म्हणून संगीत कला आत्मसात केली. अन्य समाजानेही आपापल्या परीने लोकसंगीत जोपासले. कीर्तनानिमित्त गोव्यात येणाऱ्या बुवांकडून शास्त्रीय संगीताची ओळख येथील कलाकलारांना झाली. विशेष म्हणजे स्त्री कलाकारांनी संगीत क्षेत्रात खूप मोठी उंची गाठली. गोव्यातील अनेक नामवंत संगीत कलाकारांनी मोठा शिष्यवर्ग घडविला. अंत्रुज महालाची ही खरी श्रीमंती आहे असे नावती यांनी नमूद केले. मच्छिंद्र च्यारी यांनी मंदिर परंपरेवर बोलताना येथील मूळ पंचायतन व्यवस्था व पोर्तुगीज राजवटीत अंत्रुज महालात झालेले मंदिरांचे स्थलांतर यामागील अर्थ उलगडून सांगितला. बिभीषण सातपुते यांनी वेविध्यपूर्ण शिक्षणाचे हब म्हणून अंत्रुज महालाचा विस्तार होत असल्याचे सांगून मुक्तीपूर्व काळात झालेला शिक्षणाचा प्रसार, भाऊसाहेब बांदोडकर यांनी मुक्तीनंतर खेड्यापाड्यात सुऊ पेलेल्या शाळा व सध्या शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. आसावरी भिडे यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. कलेची समृद्धी हीच अंत्रुज महालाची खरी श्रीमंती व आता त्याच्या जोडीला लाभलेली चौफेर शिक्षणाची प्रगती याचा उहापोह डॉ. प्रभूदेसाई यांनी अधक्षीय समारोपात केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.